अजितदादांनी आदेश दिल्यास सर्व नगरसेवक एका मिनिटांत राजीनामे देतील!
All NCP corporators will give resignation aftar Ajit Pawars order

अजितदादांनी आदेश दिल्यास सर्व नगरसेवक एका मिनिटांत राजीनामे देतील!

स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व स्थायीतील चार कर्मचारी पालिकेच्या एका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजाराची लाच घेताना पकडले गेले.

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोरीच्या निषेधार्थ विरोधी पक्ष राष्ट्रवादीने बुधवारी (ता.२५) पालिकेवर मोर्चा काढत पालिका बरखास्तीची मागणी केली. "भाजपच्या बैलाला पाच टक्के पाहिजे", "भाजपच्या बैलाला शहर वाटून पाहिजे", "नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी" अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. त्यानंतर बोलताना पक्षाच्या नेत्यांनी सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर लगेच राजीनामा देतील, असं वक्तव्य केलं आहे. (All NCP corporators will give resignation aftar Ajit Pawars order)

पालिकेतील लाचखोरीचे प्रकरण १८ तारखेला उघडकीस आले. स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व स्थायीतील चार कर्मचारी पालिकेच्या एका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजाराची लाच घेताना पकडले गेले. मंजूर सहा निविदा रकमेच्या दोन टक्के रक्कम ही लाच म्हणून त्यांनी घेतली होती. त्यानंतर तब्बल आठ दिवस उशीराने जाग आलेल्या राष्ट्रवादीने आंदोलन केल्याने त्याचीही चर्चा झाली. 

अजितदादांनी राजीनाम्याचे आदेश दिले, तर एक मिनिटाचा विलंब न करता सर्व नगरसेवक राजीनामे देतील, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी सांगितले. शहराच्या नावलौकिकासाठी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी त्यांनी केली. लांडे यांनीही पालिका बरखास्तीची मागणी करताना त्यासाठी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामे देण्याची सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

दरम्यान, पालिका प्रवेशव्दारावर हा मोर्चा अडवताच तेथेच ठिय्या मांडून पालिकेतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ जागर,गोंधळ घालण्यात आला.यावेळी "भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो", "स्थायी समिती बरखास्त करा", महापालिकेत भ्रष्टाचाराचा जोर, भाजपवाले चोर", "भाजप  शहरात कोण लुटेरे, सत्ताधारी भाजप लुटेरे", "सत्ताधारी दालनात वसुलीचा गल्ला, महापालिका तिजोरीवर भाजपचा डल्ला", "सत्ताधा-यांच्या दालनात पैशांचा पाऊस, पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराचा धुडगूस", "महापालिकेचा केला वसुली अड्डा, महापालिका तिजोरीचा खड्डा", अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

भाजपच्या भ्रष्ट्राचारी कारभारामुळे महापालिकेवरील नागरिकांचा विश्वास उडाला असल्याने स्थायी समितीबरोबर पालिका बरखास्त करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर शकुंतला धराडे, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर प्रवक्ते फझल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, लिगल सेल अध्यक्ष नगरसेवक गोरक्ष लोखंडे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, पदवीधर अध्यक्ष माधव पाटील यांच्यासह नगरसेवक या आंदोलनात सामील झाले होते.  

दरम्यान, पक्षाचे शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांची अनुपस्थिती यावेळी ठळकपणे जाणवली. एऱव्हीही ते पक्षाचे कार्यक्रम वा आंदोलनात सहसा दिसत नाहीत. तर, लोकलेखा समितीच्या नियोजित बैठकांसाठी कालपासून बनसोडे मुंबईत असल्याने ते आजच्या आंदोलनात सहभागी झाले नाही, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. त्यांचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in