अजितदादांनी मुंबईच्या पालिका आयुक्तांना पुण्यात मार्गदर्शन करायला बोलविले...

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
अजितदादांनी मुंबईच्या पालिका आयुक्तांना पुण्यात मार्गदर्शन करायला बोलविले...
iqbal-chahal-ajitdada

पुणे : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्‍टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात यावे. तसेच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

येथील सरकारी विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित बैठकीत पवार म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे. त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी आवश्‍यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात.

प्रारंभी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईत विशेषत: आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे या वेळी उपस्थित होते.

मुंबईत वापरलेली त्रिसूत्री :
1. कोरोना संशयितांच्या चाचण्या वाढवा, संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्या
2. बेड्‌स आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढवा
3. रुग्णालय आणि डॉक्‍टरांचे नियोजन करा

हे पण वाचा :  खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण घरी पाठवा

कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या तथापि, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना घरी पाठविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष  नवल किशोर राम यांनी कळवले आहे. जे रुग्ण कोरोना बाधित म्हणून उपचार घेत आहेत आणि कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र असे रुग्ण घरी जाण्यास नकार देत असतील तर त्यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी राम यांनी कळवले आहे.

खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्यासाठी जिल्हा स्तरावर तपासणी पथक स्थापन करण्यात आले असून या पथकामार्फत तपासणी करण्‍यात येणार आहे. जर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुग्णालयात आढळून आले तर संबंधित रुग्‍णालयाच्या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणाचे अध्यक्ष  नवल किशोर राम यांनी दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे या  प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in