राष्ट्रपती पदक विजेत्या 'एपीआय'सह 'पीआय' अन् पोलीस कॉन्स्टेबलला लाखाची लाच घेताना पकडले

पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलला लाखाची लाच घेताना पकडण्यात आले आहे. यातील सहाय्यक निरीक्षक राष्ट्रपती पदक विजेता आहे.
राष्ट्रपती पदक विजेत्या 'एपीआय'सह 'पीआय' अन् पोलीस कॉन्स्टेबलला लाखाची लाच घेताना पकडले
acb arrested three police officer from kamshet police station for accepting bribe

पिंपरी : जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून त्यातील साडेतीन लाख रुपये घेतल्याबद्दल एकाच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (पीआय), सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि पोलीस कर्मचारी अशा तिघांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज कामशेत येथे पकडले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अडीच लाख आधी घेतल्यानंतर आज एक लाख रुपये घेताना या त्रिकुटाला ताब्यात घेण्यात आले.  

पुणे ग्रामीणमधील कामशेत पोलिस ठाण्याचे प्रमुख 'पीआय' अरविंद चौधरी, 'एपीआय' प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर, अशी अटक केलेल्या पोलिसांची नावे आहेत. एसीबी'ने दिलेल्या माहितीनुसार, लाच स्वीकारताना पकडलेला 'एपीआय' हा राष्ट्रपती विजेता आहे. बनावटगिरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले पुणे दूध संघाचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना जामीन मिळवून देण्यासाठी या तिघांनी पाच लाख रुपये मागितले होते. त्यातील पहिला अडीच लाखाचा हफ्ता त्यांनी घेतलाही होता. तर, दुसरा हफ्ता घेताना आज ते पकडले गेले. बाळासाहेब नेवाळे यांचे नातेवाईक आणि मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी याबाबत 'एसीबी'कडे तक्रार दिली होती. 

बाळासाहेब नेवाळे यांना कामशेत (ता. मावळ) पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पीडीसीसीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या तोंडावर ही अटक झाली आहे. गत विधानसभेला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. नेवाळे यांच्यासह त्यांच्या गोवित्री (ता.मावळ) गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तोतये संचालक बाळू दाखलू आखाडे, प्रकाश महादू गायकवाड आणि संस्थेचे सचिव (आता निवृत्त) बापू वनाजी दडस यांच्याविरुद्ध बनावट दस्ताऐवज बनवून संस्थेसह संस्थेचे सभासद आणि राज्य शासनाची फसवणूक केल्याबद्दलचा गुन्हा दाखल झाला. त्यात लगेच पोलिसांनी अटकही केली. 

गायकवाड हा या संस्थेचा चेअरमनही म्हणूनही मिरवत होता. याबाबत पुणे जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे गटसचिव संजय ढोरे यांनी फिर्याद दिली आहे. १५ जानेवारी २०१५ ते २४ डिसेंबर २०१९ दरम्यान घडलेल्या या गुन्ह्याबाबत काल तक्रार येताच लगेच गुन्हाही नोंद होऊन लगेच अटकेचीही कारवाई झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in