लाचखोरीबद्दल स्थायी समितीचा अध्यक्षच अटकेत : पिंपरी-चिंचवडमधील बड्या नेत्यांना धक्का

भाजपवर कुरघोडीची राष्ट्रवादीला संधी
लाचखोरीबद्दल स्थायी समितीचा अध्यक्षच अटकेत : पिंपरी-चिंचवडमधील बड्या नेत्यांना धक्का
PCMC standing committee

पिंपरी : ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्विकारताना पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १८) सापळा लावून रंगेहाथ पकडले. अध्यक्षांसह स्वीय सहायक, एक लिपिक व एक शिपाई अशा चौघांना अटक केली. लाचप्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पिंपरी-चिंचवडमधील राजकारणावरही परिणाम होणार आहे. सत्ताधारी भाजपवर कुरघोडी करण्याची संधी राष्ट्रवादीला या निमित्ताने मिळाली आहे. 

स्थायी समिती अध्यक्ष. नितीन लांडगे, त्यांचा स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे व शिपाई राजेंद्र शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी दुपारी दोन वाजता ऑनलाइन झाली. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात नदी सुधार प्रकल्पावर सादरीकरण होते. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सादरीकरण संपवून लांडगे व अन्य पदाधिकारी त्यांच्या कक्षात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी पिंगळे यांना महापालिकेच्या वाहनतळ परिसरात लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्यांना तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या कक्षात आणून चौकशी सुरू केली. त्याच वेळी अध्यक्ष व अन्य पदाधिकारी त्यांच्या दालनातून बाहेर पडले.

पिंगळे यांच्यासह तेथील अन्य कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. दरम्यान, अध्यक्ष लांडगे यांना बोलावून त्यांच्याकडेही चौकशी केली. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास लांडगे, पिंगळे, खामकर व कांबळे यांना घेऊन अधिकारी पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेतून गेले. अँड लांडगे हे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पूत्र आहेत. त्यांचे भोसरीतील श घर व जनसंपर्क कार्यालयाचीही एसीबीच्या दुसऱ्या पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली. 

महापालिकेत या पूर्वी आयुक्तांच्या पीएला बारा लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल अटक झाली होती. त्यानंतर वरिष्ठ राजकीय पदाधिकारी पहिल्यांदाच ताब्यात आला आहे. 

या साऱ्या घडामोडींमुळे सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. यावर सारवासारव करण्याची वेळ पक्षावर आली. भ्रष्टाचाराला पक्षात थारा नसून ज्यांनी चुकीचे काम केलंय त्यांना पक्ष पाठीशी घालणार नसल्याचे पालिकेतील सत्ताधारी भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

चौकशीची मागणी
पारदर्शक कारभाराबरोबर भय व भ्रष्टाचारमुक्त महापालिका अशी घोषणा करून भाजप सत्तेवर आला. परंतु, भाजप व त्यांचे पदाधिकारी टक्केवारीचे गलिच्छ राजकारण करून गैरव्यवहार भ्रष्टाचार करतात, अशा तक्रारी २०१७ पासून अनेकदा केल्या आहेत. मात्र, सरकारने त्यांना पाठीशी घातले. आज महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. हा माणूस कोणाकोणासाठी पैसे घेत होता, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. स्थायी समितीच्या मागील साडेचार वर्षाच्या सर्व निर्णयाची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई झाली पाहिजे.
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ता

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in