कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे असेही पुणे कनेक्शन... 

बोम्मई यांचा जन्म हूबळीमधील असून ते 61 वर्षांचे आहेत. कर्नाटकचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून ते बुधवारी शपथ घेतील.
कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे असेही पुणे कनेक्शन... 
Basavraj Bommai worked in Tata Motors Pune for three years

पुणे : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई हे नवे मुख्यमंत्री असतील. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या बोम्मई यांचं पुण्याशी जवळचं नातं आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात पुण्यातूनच केली आहे. (Basavraj Bommai worked in Tata Motors Pune for three years)

बोम्मई यांचा जन्म हूबळीमधील असून ते 61 वर्षांचे आहेत. कर्नाटकचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून ते बुधवारी शपथ घेतील. त्यांचे वडील एस. आर. बोम्मई हेही मुख्यमंत्री होते. त्यामुळे राजकारणाचा वारसा घरातूनच आहे. जनता दलातून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. पण त्यापूर्वी त्यांनी उद्योग क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर बोम्मई यांनी पुण्यात टाटा मोटर्स कंपनीत तीन वर्षे नोकरी केली आहे. त्यानंतर त्यांनी उद्योग क्षेत्रात आपले पाय रोवायला सुरूवात केली. उद्योगपती म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांनी जनता दलातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरूवात केली. 1997 आणि 2003 अशा दोनवेळी ते विधानस परिषदेत आमदार म्हणून गेले. 2008 मध्ये त्यांनी जनता दलाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. 

भाजपमध्ये गेल्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिला विजय मिळवला. त्यानंतर 2013 आणि 2018 मध्येही ते विजयी झाले. येडियुरप्पा यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्यामुळंच त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं. तर येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर बोम्मई यांच्याकडं मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच ही निवड करण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्यावरून कर्नाटकातील राजकारण तापलं होतं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in