IAS सौरभ राव यांनी लसीचे दोन डोस घेऊनही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण का झाली?

लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अत्यल्प
IAS सौरभ राव यांनी लसीचे दोन डोस घेऊनही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण का झाली?
sourav rao ff vaccine

पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी लशीचे दोन डोस घेऊनही त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. (Pune Divisonal Commissioner Souav Rao infected second time due to corona) पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड या प्रमुख भागासह पुणे विभागातील इतर चार जिल्ह्यांतील कोरोना साथीच्या नियंत्रणासाठीच्या समन्वयाची जबाबदारी राव यांच्याकडे आहे. पुणे विभागातील कोरोना लढाईचे तेच प्रमुख चेहरा आहेत. असे असतानाही त्यांना लस घेऊनही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होणे हा साहजिक चर्चेचा विषय बनला आहे.

सौरभ राव यांनी लसीचा पहिला डोस हा 25 फेब्रुवारी 2020 रोजी घेतला होता. तेव्हा 28 दिवसांच्या अंतराने  दुसरा डोस घेण्याचा नियम होता. आता कोव्हिशिल्ड लसीसाठी 84 दिवस आणि कोव्हॅक्सिनसाठी 45 दिवसांचे अंतर दुसऱ्या डोससाठी आहे. राव यांचा दुसरा डोस आधीच्या नियमानुसार हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झाला असण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यांनी कोविशिल्ड घेतली की कोव्हॅक्सिन याचेही उत्तर मिळू शकले नाही. पण सुरवातीच्या टप्प्यात सर्व सरकारी यंत्रणांना कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे राव यांनीही तीच लस घेतली असल्याची जास्त शक्यता आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो का, असा प्रश्न यामुळे अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्याचे उत्तर होय असेच दिलेले आहे. मात्र अशांची संख्या अत्यल्प आहे. कोरोनाची लागण झाली तरी तो सौम्य कोरोना असेल. त्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ अपवादात्मक स्थितीतच येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी दिल्या जात आहेत. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तीस एप्रिलपर्यंत कोव्हॅक्सिनचे 17 लाख 37 हजार 178 जणांना दोन डोस देण्यात आले. हे दोन डोस घेऊनही कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या फक्त 695 (0.04 टक्के) आहे. कोव्हिशिल्डचे 1 कोटी 57 लाख 32 हजार 754 जणांना डोस मिळाले. त्यातील 5014 जणांना (0.03 टक्के) कोरोनाची लागण झाली. 

पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डाॅ. संजीव वावरे म्हणाले की पुण्यात दुसरा डोस घेऊनही लागण झालेल्यांचे प्रमाण हाताच्या बोटावर इतकेच आहे. लशींमुळे सुरक्षितात मिळते, हे वेगळे सांगायची गरज नाही. दुसरा डोस हा बूस्टर डोस समजला जातो. तो घेतल्यानंतर साधारणपणे 30 ते 45 दिवसांत सर्वोच्च परिणामकारकता मिळते. त्याआधी लस घेतलेली एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तींच्या फारच संपर्कात आला तर त्याला लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण लस घेतलेल्या व्यक्तीला सौम्य लक्षणे आढळतील. त्यामुळे लस घेऊनही कोरोना होणे यामुळे लसींच्या परिणामकतेवर शंका घेण्याचे कारण अजिबात नाही. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in