खंडणी उकळणाऱ्या त्या ACP चा अहवाल डीजींना पाठविणार : के. व्यंकटेशम

पोलिसांच्या प्रतिमेला या प्रकारामुळे धक्का!
खंडणी उकळणाऱ्या त्या ACP चा अहवाल डीजींना पाठविणार : के. व्यंकटेशम
k venkatesham

पुणे : पुणे पोलिस आयुक्तालयात विशेष शाखेत असलेले सहायक पोलिस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध सातारा येथे खंडणीचा गुन्हा दाखल झाला असल्याने पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्याबाबतचा अहवाल सातारा पोलिसांकडून आल्यावर तो पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी बुधवारी दिली.

हुंबरे यांच्याविरुद्ध 40 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील भुईज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंबरे यांच्या विरोधात असलेल्या अनेक तक्रारींमुळे त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मात्र सक्तीच्या रजेवर असताना देखील गणवेश घालून त्यांनी आरोपींला अटक न करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 40 हजार रुपये स्वीकारले आहेत.

याप्रकरणी एका 22 वर्षाच्या तरुणाने भुईज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाने काही दिवसांपूर्वी गोळीबार केला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात अटक न होण्यासाठी हुंबरे यांनी तरुणाकडून 40 हजार रुपये खंडणी घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हुंबरे यांच्याविषयी पुणे शहरात अनेक तक्रारी होत्या. आयुक्तांनी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांची बदली कार्यकारी पदावरुन विशेष शाखेत केली होती. मात्र, तेथेही ते लोकांचा घोळका जमवून दरबार भरवत असल्याचे आढळून आले होते. त्याच्याबाबत तक्रारी येऊ लागल्याने कोरोना विषाणुच्या काळात पोलिस अधिकाऱ्यांची अधिक गरज असताना पोलिस आयुक्तांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. सक्तीच्या रजेवर असतानाही त्यांनी बेकायदेशीर कामे सुरूच ठेवल्याचे या प्रकरणावरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ते पोलिस खात्यातून एक महिन्याने निवृत्त होणार आहेत. हुंबरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांच्यावर लाच आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सातारा पोलिस काय अहवाल पाठवणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in