लोणावळ्यात किंवा पर्यटनस्थळी पाय ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा! - Section 144 has been imposed on tourist places in Pune district including Lonawala | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

लोणावळ्यात किंवा पर्यटनस्थळी पाय ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

गर्दी टाळण्यासाठी उचलले पाऊल.. 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहर व ग्रामीण भागातील पर्यटनस्थळी जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (Pune Collector issues section 144 in Pune district)

पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी आज  हा आदेश पारित केला आहे. यामध्ये लोणावळ्यातील भुशी धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आजपासून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

लोणावळ्यातील भुशी धरण तुडुंब भरले आणि पायऱ्यांवरून पाणी वाहू लागले आहे असे समजताच हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास बंदी असताना देखील हे आदेश व नियमांची पायमल्ली करत नागरिक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचत होते. मागील संपूर्ण महिना हा प्रकार सुरू आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली, परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करून नये, नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेकडे २६ हजार कोव्हीशील्डचे डोस

शासनाकडून महापालिकेला २० हजार कोव्हीशील्ड लसीचे डोस उपलब्ध झाले असून, ६ हजार डोस शिल्लक आहे. त्याद्वारे १८४ केंद्रांवर  शनिवारी (ता. १७) लसीकरण केले जाणार आहे. तर ६ केंद्रांवर कोव्हॅक्सीनची लस उपलब्ध असेल. लसीसाठी आॅनलाइन बुकिंग सकाळी ८ वाजता सुरू होईल. दरम्यान, रविवारी (ता. १८) शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद असतील, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

कोव्हीशील्ड
- पहिल्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे
- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध
- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२३ एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस आॅनलाइन
- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन
- ६ केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस
- पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस
- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस
-१८ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध
- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख