रिक्षावाले काकानंतर आता पुण्यात पोलिसकाका

"प्रश्‍न अनेक,मात्र त्याचे उत्तर एक असे एका वाक्‍यात पोलिसकाका संकल्पनेची व्याख्या करता येईल"- रश्‍मी शुक्‍ला, पोलिस आयुक्त पुणे
रिक्षावाले काकानंतर आता पुण्यात पोलिसकाका

पिंपरी : रिक्षावालेकाका आणि पुणे,पिंपरी-चिंचवडमधील शालेय विद्यार्थ्यांचे एक वेगळेच भावनिक नाते आहे. पालकही या काकांच्या भरवशावर मुलांना बिनधास्त हवाली करतात. या रिक्षावाले काकानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या जोडीने महाविद्यालयीन तरुण,तरुणींच्या संरक्षणासाठी आणखी एक मोठ्या भरवशाचे काका येत्या काही दिवसांत येत आहेत. ते दुसरे,तिसरे कोणी नसून खुद्द पोलिसकाका आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे राहणार नाही. ती निश्‍चित होऊन शाळा परिसर,कॉलेज कट्टा, कॅम्पसमध्ये चालणारी टवाळखोरी,ड्रग्ज आणि रॅगिंगला आळा बसेल, असा विश्‍वास ही नवी काका संकल्पना राबविणाऱ्या पुणे पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी व्यक्त केला आहे. हे नवे काका विद्यार्थ्यांचे मित्र, मार्गदर्शक आणि गुरूचीही भूमिका पार पाडतील, असे त्या म्हणाल्या.

पोलिसकाका लवकरच सेवेत दाखल होत असल्याची घोषणा नुकतीच (ता.22) शुक्‍ला यांनी ट्‌विट करून दिली आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत कॉलेज कट्टा, शाळा परिसर आणि विद्यापीठ कॅम्पसमध्ये पोलिसकाका विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसले; तर आश्‍चर्य वाटू देऊ नका. येत्या काही दिवसांतच पुणे पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांत अशा पोलिस काकांची नेमणूक स्थानिक पोलिस ठाण्यातून करण्यात येणार आहे.

ते नियमितपणे ठरवून दिलेल्या शाळा,कॉलेजात भेट देणार देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतील. त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर शाळा,कॉलेजातील नोटीस बोर्ड तसेच स्कूलबसमध्येही लावण्यात येणार आहेत. या नंबरवर वा थेट पोलिसकाकांशी आपला मोबाईल हरविला, रॅगिंग, टिझिंग, ब्लॅकमेलिंगबाबतच्या तक्रारी देता येणार आहेत. त्यांची सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे.

चाकरमानी महिलांसाठी (वर्किंग विमेन) पुणे पोलिसांनीच बडीकॉप हे मोबाईल अॅप यावर्षी 8 मार्चला सुरू केले आहे. पाच महिन्यातच एक लाख महिला त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. तर, त्याच्या मदतीने दहा प्रकरणे उजेडात आली असून काहींत गुन्हाही दाखल झाला आहे. हे अॅप आय सायबरटेक ग्लोबल कम्युनिकेशन्सचे पंकज घोडे यांनीच तयार केले आहे. नागपूरमध्ये ते सुरू झाले असून मुंबईत सुरू होणार आहे. मात्र, ते फक्त महिलांसाठी असल्याने
'सिटीफेस' हे दुसरे अॅप त्यांनी आता विकसित केले आहे. तसेच पोलिसकाका ही संकल्पनाही आमची असल्याचे घोडे यांनी सांगितले. कॉलेजमधील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकाराला पोलिसकाकांमुळे आळा बसेल, असा विश्‍वास
त्यांनी व्यक्त केला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com