BREAKING News : पुणे पोलिस दलातील पोलीस कर्मचारी व त्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग - Pune News Police Constable and His Wife Tested Positive For Corona Admitted in Pimpri | Politics Marathi News - Sarkarnama

BREAKING News : पुणे पोलिस दलातील पोलीस कर्मचारी व त्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग

पांडुरंग सरोदे
शनिवार, 18 एप्रिल 2020

अनेक दिवसांपासून पोलिस नागरिकांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी रात्रंदिवस धडपडत आहेत. असे असतानाच  पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला व  त्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले

पुणे : अनेक दिवसांपासून पोलिस नागरिकांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी रात्रंदिवस धडपडत आहेत. असे असतानाच  पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला व  त्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दोघांवरही पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलिस ठाण्यात संबंधीत पोलिस कर्मचारी सेवा बजावत असून ते पिंपरी चिंचवडमध्ये राहतात. मागील काही दिवसांपासून ते पोलिस ठाण्यात रात्रपाळी करीत होते. दरम्यान त्यांच्या पत्नीला त्रास होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्याचवेळी पोलिस कर्मचाऱ्याला घशात त्रास होऊ लागल्याने त्यांची ही तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा देखी अहवाल पॉझिटिव्ह आला.

पिंपरीच्या  वायसीएम रुग्णालयात दाखल

दरम्यान, पोलिस कर्मचारी व त्यांच्या पत्नीला तत्काळ पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर खबरदारी म्हणून संबंधित पोलिस कर्मचारी सेवा बजावत असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची ही तपासणी केली जाणार आहे.

या घटनेमुळे पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. मात्र पुणे पोलीस दलाकडून पोलिसांना कोरोनाचा  संसर्ग होऊ नये, यासाठी सुरुवातीपासूनच काळजी घेतली जात आहे. सर्वांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, नागरिकांची तपासणी करताना योग्य ती काळजी घेणे यांसारखी उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

पोलिस कर्मचाऱ्याला कोरोना संसर्गाची पुण्यातली पहिलीच घटना

येरवडा परिसरातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची तपासणी करण्यात आली, मात्र त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानंतर थेट पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग होण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे.

पोलिसांना संसर्ग होऊ नये म्हणून पुरेपुर काळजी - डाॅ. शिसवे, सह आयुक्त

पोलिस कर्मचाऱ्याला त्रास होत असल्याने तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले तसेच त्यांच्या पत्नीलाही संसर्ग झाला आहे. दोघांवरही वायसीएममध्ये उपचार सुरू आहेत. पोलिस थेट लोकाच्या संपर्कात येतात. पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासूनच पुरेपूर काळजी घेत आहोत - डॉ.रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख