पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर धारदार टीका

पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्ष आहे की नाही, असे वृत्त ''सरकारनामा''ने (ता.14) देताच त्याची तातडीने दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दोन दिवस तयारी करून सत्ताधाऱी भाजपवर धारदार टीका केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर धारदार टीका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्ष आहे की नाही, असे  वृत्त ''सरकारनामा''ने (ता.14) देताच त्याची तातडीने दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दोन दिवस तयारी करून सत्ताधाऱी भाजपवर धारदार टीका केली. 

सभागृह नेते एकनाथ पवार यांचा ''फंटूश आणि महाभाग'' असा उल्लेख करीत भाजप राजवटीत पालिका सभागृह कठपुतळ्यांचा बाजार झाल्याचे विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले. सभागृहाबाहेरील एक स्वयंघोषित वझीर पालिका कारभार हाकत असल्याने महापौर, सभागृहनेते, सत्ताधारी पदाधिकारी व नगरसेवक हे कठपुतळी झाल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला. अशा टीकेची सवय नसल्याने गांगरून गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आपत्कालीन अनौपचारिक बैठक घेत प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. पराभवातून न सावरलेल्याने नैराश्यातून ही टीका विरोधकांनी केल्याचे पवार म्हणाले. 

विरोधी पक्षाची भूमिका वठविण्यात अपयशी ठरलेल्या राष्टवादीचा आक्रमकपणा सभागृहाबाहेरही दिसून येत नसल्याचे सरकारनामाने प्रसिद्ध करताच खडबडून जागा झालेल्या या पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आज तोफगोळेच डागले. मात्र टीका करताना बहल यांची भाषा काहीशी शिवराळ झाल्याने ती पालिका वर्तुळात मोठा चर्चेचा विषय झाली. स्थायी समितीतील अनागोंदी कारभाराला वाचा फुटू नये म्हणून भाजपने बजेट विनाचर्चा संमत केले, असा आरोप त्यांनी केला. टक्केवारी, खाबूगिरी आणि उन्मतपणा चार महिन्यांतच भाजपमध्ये भिनला असून त्यांना सत्तेची नशा चढली आहे, असे ते म्हणाले. स्थायीने या बजेटला 549 उपसूचना देऊन मोठा मलिदा गोळा केला असल्याचा बॉम्ब त्यांनी टाकला.

साद-पडसाद
बहल यांचा टीकेचा भडीमार सुरु असतानाच त्याची खबर लगेचच सभागृहनेत्यांकडे गेली. एवढेच नाही, तर बहल यांनी बजेटबाबत पलिका नियमांचा आधार घेत आठपानी लेखी काढलेले निवेदनही तिकडे पोचले. त्यावर खल होऊन लगेचच बहल यांचे आरोप खोडून काढण्यात आले. बजेटनिमित्त सुरु झालेली ही आरोप-प्रत्यारोपाची फैर आणखी वाढणार असून आजच्या (ता.20) आमसभेत त्यावरून मोठा गदारोळ उडण्याची दाट शक्यता आहे.

बहल उवाच 

  • भाजपच्या बेलगाम कारभारामुळे कुठे नेऊन ठेवलाय पिंपरी-चिंचवड माझा अशी विचारणा  शहरवासीय करू लागले आहेत.
  • भाजप नगरसेवकांना पालिका कारभाराचा कसलाही गंध नाही.
  • सत्ताधारी नगरसेवक कठपुतळी, तर महापौर हे अधिकार नसलेला केवळ नावाचा राजा
  • सभागृहाबाहेरील वझीराने सभागृहनेत्याला बनविले फंटूश
  • एकतर्फी बजेट संशयास्पद. ते प्रथम संमत करून नंतर त्यावर चर्चा म्हणजे अगोदर विवाह आणि नंतर विवाहाची बोलणी असे आहे.
  • विरोधकांची मुस्कटदाबी हा शहरवासियांचा अपमान
  • खोटे रेटून बोलण्याची प्रवृत्ती असलेल्या सभागृहनेत्याला दुसरे काही काही जमणार नाही.
  • पठाणी वसुलीसाठी ठेकेदारांची 159 कोटी रुपयांची अडविली भाजपने.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com