पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी : मुख्यमंत्री

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी : मुख्यमंत्री

शिक्रापूर : खेडमध्ये विमानतळ होणार नसतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ताकाळात ते होणार असे सांगून लोकांना खूप दिवस फसवले. मात्र विमानतळ होणार नसल्याचा तज्ञांचा अहवाल आल्यावर हे अपयश खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या माथी त्यांनी फोडले. पण काळजी करू नका आम्ही पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मंजूर केली असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याचे भूमिपूजन करू अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शिक्रापूर (ता.शिरूर) येथे केली.
 
शिरूर लोकसभा मतदार संघाचे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत सर्वप्रथम आमदार बाबूराव पाचर्णे यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची आडकाठी असल्याचे सांगितले व माजी आमदार अशोक पवार यांनी व्यंकटेश कृपा साखर कारखान्याचे 18 हजार शेअर कधी देणार असा प्रश्न उपस्थित केला.

खासदार आढळराव सांगितले की, पुणे-नाशिक, पुणे-नगर रोड यासाठी मोदी सरकारच्या काळातच निधी उपलब्ध झाला. मात्र पूर्वीच्या काँग्रेस सरकारने रस्त्यांच्या कामासाठी एक दमडाही दिला नाही. कांद्याचा प्रश्न संसदेत उपस्थित केल्यावर जिल्ह्याला 25 कोटी कांदा अनुदान मिळाले. या वेळीची निवडणूक देशाच्या भवितव्याची असून शेजारील देशही या निवडणूकीवर लक्ष ठेवून असल्याने मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आक्रमक भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या अनेक वर्षांच्या कारभाराचे वाभाडे काढले. विमानतळ होणार नसताना ते होणार असे काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ताकाळात जाहीर करून लोकांना फसवले. मात्र तज्ञांच्या आठ सर्व्हेंनंतर विमानतळ होणार नसल्याचे लक्षात आल्यावर हे अपयश खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या माथी त्यांनी फोडले. पण काळजी करू नका, 234 प्रती तास किलोमिटरची पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मंजूर केल्यावर आम्ही आता जाहिर करीत असून भूसंपादन वेळेत झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याचे भूमिपूजन करू अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. 

बैलगाडा शर्यती या राष्ट्रवादीने बंद केल्या पण आम्ही सरकार म्हणून पूर्ण ताकदीने न्यायालयात उतरलोय आणि खासदार आढळराव यांच्या लढयासोबतही आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल आणि बैलगाडा शर्यतीही लवकरच सुरू होतील. शेतकऱ्यांसाठी प्रती वर्षी 75 हजार कोटींचे शेतकरी सन्मान मानधन, 5 वर्षात 20 हजार किलोमिटरचे राष्ट्रीय महामार्ग, 13 कोटी उज्वला गॅसजोड, 10 हजार किलोमिटरचे हायब्रीड अॅन्यूएटी राज्य महामार्ग हे सर्व खासदार आढळराव यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मोदी सरकारचे कर्तृत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

भाषणाचे शेवटी ऊरी आणि पुलवामा हल्ल्याचा संदर्भ फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्यावरुन दोन्ही पक्षांना लक्ष्य करीत देशद्रोह्यांना- अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना मदत करायची की, देशहीत पाहणाऱ्या भाजप- सेना युतीला साथ द्यायची हे तुम्हीच ठरवा असे म्हणत देशघोषणेने सभेचा समारोप केला. 

सभेला आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे, योगेश टिळेकर, निरंजन डावखरे, शिवसेना नेत्या जयश्री पलांडे, दादा पाटील फराटे, धर्मेंद्र खांडरे, अनिल काशिद, भगवानराव शेळके व युतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com