मीरा कलमाडींना 'प्रमोट' करण्यासाठी पुण्याचे काँग्रेस नेते लागले कामाला

माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी काही वर्षे पुण्याचा कारभार एकहाती चालवला. मात्र, काॅमनवेल्थ गेम्स गैरव्यवहार प्रकरणानंतर तुरुंगात जावे लागल्याने काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. याच सुरेश कलमाडींच्या पत्नी मीरा कलमाडी यांना या महिन्याच्या अखेरीस प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्याने आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या बोलावण्यात आले आहे. 'मीराभाभींना'च्या आडून सुरेश कलमाडी यांची पूर्वीची ताकद पक्षासाठी वापरुन घेण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जाणार आहे.
मीरा कलमाडींना 'प्रमोट' करण्यासाठी पुण्याचे काँग्रेस नेते लागले कामाला

पुणे : माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी काही वर्षे पुण्याचा कारभार एकहाती चालवला. मात्र, काॅमनवेल्थ गेम्स गैरव्यवहार प्रकरणानंतर तुरुंगात जावे लागल्याने काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. याच सुरेश कलमाडींच्या पत्नी मीरा कलमाडी यांना या महिन्याच्या अखेरीस प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्याने आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या बोलावण्यात आले आहे. 'मीराभाभींना'च्या आडून सुरेश कलमाडी यांची पूर्वीची ताकद पक्षासाठी वापरुन घेण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जाणार आहे.

सुरेश कलमाडी हे तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. 1996, 2004 आणि 2009 या तिन्ही लोकसभा निवडणुकीत ते पुण्यातून लोकसभेवर निवडले गेले. (कै.) पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ते रेल्वे राज्यमंत्री होते. राज्यमंत्री या नात्याने रेल्वेखात्याचा अर्थसंकल्प मांडणारे ते पहिलेच मंत्री. 2010 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या काॅमनवेल्थ गेम्सच्या संयोजनात त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यांना अटकही झाली. नंतर काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली.

कलमाडी यांच्या काळात पुणे शहर काँग्रेसचा कारभार काँग्रेस भवनातून नव्हे तर 'कलमाडी हाऊस' मधून चालवला जात होता. मात्र, नंतरच्या काळात कलमाडींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. त्यांच्या अटकेनंतरच्या काळात त्यांच्या अऩेक समर्थकांचे 'कलमाडी हाऊस'वर जाहीरपणे जाणे थांबले. मात्र, काँग्रेसचे अनेक आजी-माजी नगरसेवक अद्यापही कलमाडी यांना मानतात.

दरम्यानच्या काळात पुणे शहर काँग्रेसमध्ये असलेल्या दोन गटांमधील मतभिन्नता अधिक वाढली आहे. पूर्वीही काँग्रेसमध्ये दोन गट होते. मात्र, कलमाडी यांचा गट अधिक प्रबळ होता. आताही त्यांची ही जुनी ताकद पक्षाच्या उपयोगी ठरू शकते, हे जाणून काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने एक पाऊल मागे घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच येत्या 29 तारखेला दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी मीरा कलमाडी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

प्रदेश काँग्रेसचे सचीव संजय बालगुडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. टिळक रस्त्यावरील डाॅ. नितू मांडके सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मीरा कलमाडी यांच्यासह विधान परिषद सदस्य अनंत गाडगीळ माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमात मीरा कलमाडी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सुरेश कलमाडी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये नसले तरीही अनेक काँग्रेस नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही कलमाडी यांची भेट घेतल्याचे समजते. मात्र, याला अधिकृतपणे दुजोरा मिळू शकलेला नाही.

लोकसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली आहे. काँग्रेसही त्याला अपवाद नाही. गेल्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. कदम यांना पुन्हा उमेदवारी द्यायला काँग्रेसमधील एका गटाचा विरोध आहे. याच गटाने वर उल्लेखलेला कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला मीरा कलमाडी यांच्यासह अभय छाजेड यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करुन कदम यांच्यावर तीर साधण्याचा काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com