भाजपची छत्री घेऊन नाईककाका काॅंग्रेस भवनात येतात तेव्हा... - when Naikkaka reaches congress bhavan to repair his umbrella given by bjp corporator | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भाजपची छत्री घेऊन नाईककाका काॅंग्रेस भवनात येतात तेव्हा...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 जून 2021

सोशल मिडियात छत्री हिट... 

पुणे : पुण्यासारख्या शहरात कोणता विषय कसा ट्रेंडिंग होईल ते काही सांगता येत नाही. त्यात भाजप विरुद्ध काॅंग्रेस असे असेल तर दोन्ही बाजूंनी आयतीच संधी मिळते.

माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकाराने पुणे शहर कॉंग्रेसने चक्क छत्री दुरूस्तीचा कार्यक्रम 14 जूनपासून काॅंग्रेस भवनात घेतला. जेथे नगरसेवक थेट नव्या छत्र्या वाटप करत असताना काॅंग्रेस कसे असे क्षुल्लक कार्यक्रम आयोजित करत असल्याबद्दल भाजप समर्थकांनी टिकेची झोड उठवली होती. काॅंग्रेसचे छत कोसळलेले असताना आता छत्र्या कसल्या दुरूस्त करता, असा सवाल विचारला जाऊ लागला. त्यात भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनीही उडी घेतली.

``सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा... या होर्डिंग च्या किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या,``असा टोमणा त्यांनी मारला. त्यांच्या या ट्विटवर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आल्या. या वादाला रंगत चढली आज दुपारनंतर. ती नाईक काकांच्या छायाचित्रामुळे. त्यात नाईक काकांनाही टोमणे मारण्यात आले. 

 

हे पुणेकर नाईक काक शनिवार पेठेतील रहिवासी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेने भाजपाच्या ध्वजाच्या रंगाच्या छत्र्या या पूर्वी वाटल्या होत्या. ती नादुरुस्त झाल्याने नाईक काकांनी ही छत्री कॉंग्रेस भवनात सुरू असलेल्या कॉंग्रेसच्या छत्री शिबीरात दुरुस्तीला आणली. त्यातून नाईक काकांची छत्री आणि कॉंग्रेसच्या या छत्री दुरुस्ती शिबीराची चर्चा सुरू झाली. मोफत छत्री दुरुस्ती उपक्रमांची माहिती मिळाल्यानंतर माझ्याकडे असलेल्या नादुरुस्त छत्री मी इथे घेऊन आलो, असे नाईक यांनी सांगितले. शहर कॉंग्रेसने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुकही नाईक यांनी केले. येथून भाजपची छत्री काॅंग्रेसच्या आश्रयाला अशी टिप्पणी सुरू झाली. अनेकांच्या व्हाॅटस अपवर हा फोटो फिरला. त्यामुळे काॅंग्रेसचे हे छत्री दुरूस्ती शिबिरर राज्यभर प्रसिद्ध झाले. 

या शिबिराचे संयोजक मोहन जोशी म्हणाले की अवघ्या पाच दिवसांत सुमारे चारशे नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. केवळ कॉंग्रेस भवन नव्हे तर प्रत्येक वॉर्डमध्ये काँग्रेस कार्यकर्ते हा उपक्रम राबवणार आहेत. अशा लोकोपयोगी उपक्रमातून काँग्रेस पक्ष सर्वसामान्य, गरीब व मध्यमवर्गीय जनतेशी कनेक्ट होत आहे. अनेकांकडे छत्र्या असतात पण त्या दुरुस्त करणारा कारागीर नसतो. म्हणून हा उपक्रम आयोजित केला होता. काँग्रेसच्या या उपक्रमावर सोशल मीडियातून टीका सुरू केली हे अपेक्षितच होते. सर्वसामान्य जनतेला मोफत छत्रीदुरुस्ती कार्यक्रमातून काँग्रेस पक्षाने थोडा हातभार लावला तर भाजपच्या पोटात दुखण्याचे कारण काय?

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख