कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपचार पद्धतीचे निश्चितीकरण : डॉ. दीपक म्हैसेकर - pune divisional commissioner dr dipak mhaisekar about corona treatment | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपचार पद्धतीचे निश्चितीकरण : डॉ. दीपक म्हैसेकर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 एप्रिल 2020

पुणे विभागामध्ये रक्त संकलनाची शिबीरे घेतली जात असून आवश्यकतेनुसार रुग्णास रक्त पुरवठा करण्यात अडचण येणार नाही.

पुणे : 'कोरोना'बा‍धित रुग्ण व विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपचार पध्दतीचे निश्चितीकरण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात 'कोरोना' बाधित रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यावसायायिकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती रुबल अगरवाल, राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी संचालक डॉ. सुभाष साळुंखे, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. डी. बी.कदम तसेच ससून कोवीड हॉस्पीटल, नायडू हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

आजवर 'कोरोना' बाधित रुग्ण उपचार घेत असलेले व घरी गेलेल्या रुग्णावरील वैद्यकीय उपचार औषधे आणि त्यांच्या प्रकृतीबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला. डॉ. म्हैसेकर म्हणाले, केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनूसार रुग्णांची वर्गवारी कोवीड काळजी केंद्र, समर्पित आरोग्य केंद्र व कोवीड हॉस्पीटल अशा तीन स्‍तरावर करणे आवश्यक आहे. (कोवीड केयर सेंटर) मध्ये प्राथमिक लक्षणे आढळलेल्या रुग्णास रुग्णालयात दाखल न करता होस्टेल, लॉज अथवा हॉटेल्स, जी 'कोरोना' रुग्णांच्या आयसोलेशनसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत, अशा ठिकाणी एडमिट करुन रुग्णास निरिक्षणाखाली ठेवावे. 'कोरोना' बाधित संशयित रुग्णास (डेडीकेटेड हेल्थ सेंटर) दाखल करावे. अशा केंद्रात आयसोलेशनची, रुग्णवाहिकेची सुविधा आवश्यक आहे. 'कोरोना' बाधित गंभीर रुग्णांना कोवीड हॉस्पीटमध्ये दाखल करावे. याठिकाणी व्हेंटिलेटर, डायलेसिस यंत्रणा, तज्ञ डॉक्टर्स, ऑपरेशन थेटर, सर्जन व नर्सेस अशा अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा  व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आवश्यक आहेत. 'कोरोना' बाधित रुग्णांचे अशा प्रकारे वर्गिकरण केल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेचा भार कमी होऊन प्रभावीपणे उपचार करणे सोईचे होईल असे सांगून आयुक्त्तांनी वैद्यकीय उपचारांचा आढावा घेवून सूचना दिल्या.

मदतीचे आवाहन

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी  साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

 डॉक्टर्स रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांच्यासाठी एन 95 व सर्जिकल मास्क तसेच त्या अनुषंगीक साहित्याची गरज आहे, त्याचप्रमाणे अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची सुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्था आदीं दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. साहित्य स्वरुपात ही मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख