महेश लांडगेंना 'मातोश्री'वरुन स्वतंत्र बैठकीसाठी निरोप

महेश लांडगेंना 'मातोश्री'वरुन स्वतंत्र बैठकीसाठी निरोप

शिक्रापूर : भोसरी येथील जागा प्रतिष्ठेची असून तिथे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली होती. भाजपा-शिवसेना मतांची एकुण आकडेवारी आणि भोसरीच्या आगामी राजकारणाच्या अनुषंगाने आमदार महेश लांडगे यांना 'मातोश्री' वरुन बैठकीसाठी निरोप देण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी दिली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार ही बैठक होणार असल्याचेही कटके यांनी सांगितले.

'शिरुर'च्या सहाही विधानसभा मतदार संघातील सर्व इच्छुक, संभाव्य शिवसेनेत प्रवेश करणारे पदाधिकारी, युती झाल्यास आणि नाही झाल्यास संभाव्य उमेदवार आणि भोसरी व जुन्नर मधील विद्यमान आमदारांना पूर्ण ताकदीने पाठबळ देण्यासाठीची व्यूहरचना. अशा अनेक विषयांच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकतीच जिल्हाप्रमुख माऊली कटके यांचेशी तब्बल दीड तास चर्चा केली.

विशेष म्हणजे या चर्चेसाठी केवळ संघटनेतीलच पदाधिकारी उपस्थित राहतील, असा शिरस्ता पाळला गेला. पर्यायाने 'शिरुर'साठी थेट उद्धव ठाकरे यांनीच आता धनुष्यबाण ताणले आहे. या बैठकीची माहिती कटके यांनी दिली. लांगडे यांची बैठक ठरल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. 

शिरुर लोकसभा मतदार संघातील पराभव शिवसेनेने गांभिर्याने घेतला असून सहाही विधानसभा मतदार संघातील सर्व तालुकाप्रमुख व सर्व उपजिल्हाप्रमुख यांना घेवून येण्याचा आदेश जिल्हाप्रमुख माऊली कटके यांना झाला आणि त्यानुसार केवळ संघटना पदाधिका-यांची बैठक मातोश्रीवर नुकतीच झाली. विशेष म्हणजे सर्व पदाधिका-यांच्या बैठकीनंतर ठाकरे यांनी कटके यांचेशी स्वतंत्र दिड तास चर्चा केल्याने 'शिरुर' शिवसेनेचे सर्व राजकारण आता कटके यांच्या भोवती फिरणार हे नक्की.

दरम्यान नुकत्याच झालेल्या या बैठकीत जुन्नर बाबत बोलताना ठाकरे यांनी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांचेवरील कारवाईचे समर्थन करतानाच विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचेसाठी पूर्ण ताकद उभी करीत असल्याचे सांगितले. या शिवाय राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या जुन्नर मधील एका उमेदवाराकडून खासदार गिरीश बापट यांचेकडे उमेदवारीसाठी चाललेल्या चर्चेबाबतची माहितीही मातोश्रीपर्यंत आल्याचे यावेळी ठाकरे यांचेकडून आपल्याला सांगण्यात आल्याचेही कटके यांनी सांगितले.

'खेड'च्या उमेदवारीबाबत निर्णय झाल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले असून मी स्वत: शिरुर-हवेलीमधून इच्छुक असल्याचे यावेळी आपण  सांगितल्याचे कटके यांनी सांगितले. आंबेगाव-शिरुरबाबत बोलताना ठाकरे यांनी सांगितले की, उपनेते शिवाजीराव आढळराव यांनीच तेथील उमेदवारीचा अंतीम निर्णय आपल्याला सांगायचा असून त्यानुसार उमेदवारी निश्चितीसह त्या भागातील जे राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित केला जाणार आहे. हडपसर येथे शिवसेनेचे नगरसेवक संख्या कमी असताना तिथे संघटनेची ताकद वाढविण्याबरोबरच कोण इच्छुक आहेत त्यांच्या नावांचीही चर्चा यावेळी केल्याचे कटके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com