कोतकरांना धडा शिकविणाऱ्या ज्योतिप्रिया सिंह नगरच्या SP होणार का? 

आरोपींच्या प्रत्येक डावपेचाला त्या पुरून उरल्या. हा खटला नाशिकला चालवला गेला. भानुदास कोतकर, संदीप कोतकर व इतरांना जन्मठेप झाली. अशोकला न्याय मिळाला, कोतकरांचं साम्राज्य उद्धवस्त झालं! एखाद्या चित्रपटाला साजेल अशा घटना या प्रकरणात घडल्या आणि त्याच्या नायिका होत्या ज्योतिप्रिया सिंह!
कोतकरांना धडा शिकविणाऱ्या ज्योतिप्रिया सिंह नगरच्या SP होणार का? 

नगर शहरातलं केडगाव सध्या राज्यात गाजतंय. संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसेना कार्यकर्त्यांचे दिवसाढवळ्या मुडदे पाडण्यात आलेत. खून इतके निघृण की गोळ्या झाडल्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हत्त्याकांडानंतर वीस मिनिटे मृतदेह रस्त्यावर पडून होते, तिथे जवळही कुणी फिरकले नाही. नगर शहरात घटना घडूनही कोणतीच मदत वेळेत मिळाली नाही.

महाराष्ट्र आहे की बिहार, असा प्रश्‍न पडावा इतकी पोलिस यंत्रणा भ्रष्ट आणि सुस्त. हे कमी की काय म्हणून रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला. नगर पोलिसांची उरली सुरलीही गेली... 

पण याच नगरमध्ये, याच केडगावमधल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्‍या आवळण्याचे काम आयपीएस अधिकारी ज्योतीप्रिया सिंह यांनी सहा वर्षांपपूर्वी केले होते. हाल हाल करुन मारलेल्या अशोक लांडेला त्यांनी न्याय मिळवून दिला, त्याबरोबरच अशोकची हत्त्या करणाऱ्या भानुदास कोतकर, संदीप कोतकर या गुन्हेगार राजकारण्यांना जन्मठेप भोगायला पाठवले. नगर पोलिसांची रया गेलेली असताना पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या ज्योतीप्रिया सिंह यांच्या या धडाकेबाज कामगिरीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 

शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांड प्रकरणी नगरमधील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अटकेत आहेत. त्याबरोबरच औषधोपचारासाठी कारागृहाबाहेर आलेल्या भानुदास कोतकरांवर खुनाच्या कटाचा आरोप आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिलेही आरोपांच्या पिजऱ्यात आहेत. भानुदास कोतकरांचा मुलगा जो जन्मठेप भोगतो आहे, तो पूर्वी नगरचा महापौर होता. राष्ट्रवादीचे आमदार असलेले संग्राम जगताप हे पूर्वी महापौर होते. संग्राम आणि संदीप हे आमदार शिवाजी कर्डिलेंचे जावई आहेत. हे नातेसंबंध लक्षात घेता कोतकर कुटूंबाची ताकद लक्षात येते.

याच कोतकरांचा पुतण्या विशाल नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून विजयी झाला. त्याच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार ताकद लावली होती. भाजपने तिथे नावाला उमेदवार दिला होता. कोतकरांनी निवडणूक जिंकली. मिरवणुकीचा गुलाल उधळला जात असतानाच दोन शिवसेना कार्यकर्ते पाठलाग करुन मारले गेले. गुलालाचा रंग लाल रक्ताने माखला! 

या हत्याकांडाची चर्चा होत असताना नेहमी भानुदास कोतकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी उभारलेलं साम्राज्य चर्चेत येतं. नगरच्या गुन्हेगारी जगतावर वर्चस्व असलेल्या कोतकरांच्या साम्राज्याला कोणी आव्हान दिले असेल कां?, असा प्रश्‍नही पडणार नाही. कारण कोतकरांच्या गुन्हेगारीच्या घटना अनेक आहेत, मात्र त्या पोलिस डायरीपर्यंत पोचल्यात नाहीत. पोचल्या तरी पोलिसांनी त्याकडे लक्ष दिले नाही! 2011 मध्ये या कोतकरांचा ज्योतीप्रिया सिंह या धाडसी पोलिस अधिकाऱ्याशी सामना झाला. हाल हाल करुन मारण्यात आलेल्या अशोक लांडेला न्याय देण्यासाठी त्या बेधडक केडगावमध्ये घुसल्या. सिंघम स्टाईलने भानुदास कोतकरांच्या मुसक्‍या आवळल्या. अर्थात त्यावेळी सिंघम सिनेमा आलाही नसेल, मात्र या कारवाईने नगरच्या गुन्हेगारी जगतात भूकंप झाला. 

अशोक लांडे खूनप्रकरण 
अशोक लांडे या युवकाचा खून 19 मे 2008 रोजी झाला होता. मात्र अशोक हा अपघातात जखमी झाल्याचा बनाव करुन भानुदास कोतकर यांनी त्याला हॉस्पीटलला दाखल केले होते. कोतवाली पोलिसांनी कोतकरांना सहाय्य करण्यासाठी प्रकरणावर पडदा टाकला होता. तसा अहवाल न्यायालयाला दिला होता. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शंकर राऊत यांच्या फिर्यादीवरुन भानुदास कोतकर, संदीप कोतकरसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याचा तपास एका पोलिस उपाधीक्षकाकडे देण्यात आला, मात्र तोही "कोतकर फॅन क्‍लब'मधला निघाला. शेवटी तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी तपासाची जबाबदारी तत्कालिन सहाय्यक पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांच्याकडे सोपवली. 

आयपीएसचं ट्रेनिंग संपल्यानंतर ज्योतीप्रिया यांचं पहिलं पोस्टिग नगरला होतं. करुन दाखविण्याची संधी होती. तरुण रक्‍ताच्या ज्योतीप्रिया यांनी कोणताही दबाव मानता ती संधी साधली. संपुर्ण प्रकरणाचा अभ्यास केला. तपास यंत्रणा लाखो रुपयांना विकली गेल्याचं त्यांना पानोपानी दिसत होतं. ज्या अधिकाऱ्याकडे या खून प्रकरणाची चौकशी दिली होती, तो अधिकारीच कोतकरांच्या गाडीतून फिरत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळचं हे प्रकरण ज्योतिप्रिया यांच्याकडं आलं होतं. 

अशोक लांडेचा मृत्यू अपघाती नव्हता. त्याचा हाल हाल करुन खून करण्यात आला होता. तलवारीनं त्याला भोकसलं होतं. नंतर अंगावर गाड्या घालून अपघात दाखविण्याचा प्रयत्न झाला. मात्र तपासाच्यादृष्टीने पुरावे मिळणे हे मोठे आव्हान ज्योतीप्रिया सिंह यांच्यासमोर होतं. 

शवविच्छेदन अहवाल त्यांनी बारकाईने अभ्यासला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता व्हिसेराचा अहवाल येणे गरजेचे होते, मात्र तो पाठवलाच गेला नव्हता. आरोपींचे हात इतके वर पोचले होते की व्हिसेराची तपासणी करणारा दोन-तीनदा पत्र पाठवूनही तो रिपोर्ट देत नव्हता. जेव्हा पुरावा नष्ट करण्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा कुठे व्हिसेरा आला. अशोकचा मृत्यू अपघाती नाही, याला पुष्ठी देणाऱ्या बाबी अहवालातून मिळाल्या. या गुन्ह्यात पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्‍टरवर प्रचंड दहशत होती. सोयीचा अहवाल द्यावा म्हणून प्रयत्न झाले होते, मात्र डॉक्‍टर बळी पडला नाही. अशोकचा मृत्यू अपघाती नव्हता, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांचा अहवाल पुरेसा होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे आले होते. 

ज्योतीप्रिया यांनी आरोपींवर दहशत बसवली होती. या साक्षीदारांना तातडीने न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे नेऊन त्यांचे जबाब नोंदवले. त्यामुळे गुन्ह्याचा तपास आणखी बळकट झाला. आरोपींना न्यायालयाने काही अटींवर जामीन दिला तर ज्योतीप्रिया सिंह वरिष्ठ न्यायालयाकडे जायच्या. आरोपींच्या प्रत्येक डावपेचाला त्या पुरून उरल्या. हा खटला नाशिकला चालवला गेला. भानुदास कोतकर, संदीप कोतकर व इतरांना जन्मठेप झाली. अशोकला न्याय मिळाला, कोतकरांचं साम्राज्य उद्धवस्त झालं! एखाद्या चित्रपटाला साजेल अशा घटना या प्रकरणात घडल्या आणि त्याच्या नायिका होत्या ज्योतिप्रिया सिंह! 

अर्थात ज्योतिप्रिया यांनी एकट्या कोतकरांचे साम्राज्य उद्धस्त केलं नव्हतं. नगरमधील अवैध धंद्याची पाळेमुळे त्यांनी खोदून काढली होती. नगरमध्ये सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्यांचा पर्दा फाश केल्यानंतर त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. त्यांचा फोन नंबर नको त्या ठिकाणी लिहून त्यांचा छळ होईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. एसपी कृष्ण प्रकाश त्यांच्या पाठीशी होते. त्यांनीही त्यांना कारवाईला मुक्त वाव दिला. 

दोन शिवसैनिकांच्या हत्येमुळे नगर, केडगाव आणि कोतकर पुन्हा चर्चेत आले आहेत. कोतकर बाप लेक जन्मठेपेत असतानाही त्यांची दहशत कायम कशी, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पोलिस यंत्रणा गुन्हेगार राजकारण्यांची बटीक झाल्याचे दिसत आहे. कॅबिनेट मंत्री रामदास कदम यांनी तर पोलिसांच्या सहकार्यानेच हत्याकांड घडवल्याचा आरोप केला आहे. नगरचे पीआय, डीवायएसपींवर त्यांनी नांव घेवून आरोप केले आहेत. अर्थात पोलिसांचं नेतृत्व याला अधिक जबाबदार आहे. पार्श्‍वभूमीवर ज्योतीप्रिया  यांच्यासारख्या दमदार अधिकाऱ्याची चर्चा लोकांमधून होते आहे. 

कोल्हापूर येथे अतिरिक्त अधीक्षक म्हणून केलेली कामगिरी असो की जालना सारख्या जिल्ह्यात अधीक्षक म्हणून पेललेली जबाबदारी असो तेथे ज्योतिप्रिया सिंग यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. सध्या त्या पुणे पोलिस दलातील विशेष शाखेत उपायुक्त म्हणून काम करत आहेत. चांगले अधिकारी हे सरकारचेही दूत असतात. व्यवस्था अशा चांगल्या अधिकाऱ्यांमुळे टिकून राहते. मात्र त्यांना योग्य त्या ठिकाणी नेमून जनतेला विश्‍वास देण्याचे काम राज्यकर्ते दाखविणार का, हा प्रश्‍न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com