pune corporator work for hadapsar public in corona crisis | Sarkarnama

या नगरसेवकाने दवंडी दिली, रक्तदान केले आणि अडलेल्या लोकांनाही घरी सोडले

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 26 मार्च 2020

पुण्यातील अनेक नगरसेवक करोना साथीच्या काळात रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत आहेत.

पुणे : कोरोनाच्या धास्तीनं कापरं भरण्याची वेळी आली असतानाच पुण्यातील एका नगरसेवक गल्लीबोळात फिरतोय, हातात माइक घेऊन लोकांना काळजीचं आवाहन करतोय, चौका-चौकात फिरत दवंडी पिटतोय, रक्तदानाचा कार्यक्रम घेतला...मग, कुठं घोळक्यानं लोक दिसले की ओरडतोय, आपल्या घरी गाडीवर त्यांना घरी सोडतोय, भाज्यासाठी गर्दी झाली म्हणून भाजी मंडईही बंद करतोय....हे सगळं करतायेत, पुण्यातील हडपसरमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे...

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आणि लोक तशी फारशी काही काळजी घेत नाहीत, हे चित्र ठळक झाल्यापासून योगेश नवनवे प्रयोग करीत लोकांना काळजीचं आवाहन करतायेत. कोरोनापासूनच्या बचावासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी? अगदीच मास्क कसा वापरायचा,त्याची विल्हेवाट कुठे लावायची? यासाठी तर योगेश स्वत:च हडपसरच्या गल्लीबोळात चक्क दवंडी पिटली. त्यापलीकडे जाऊन दुचाकीवर फिरत घराबाहेर पडू नका, घरात राहून काळजी घेण्याचं आवाहन करीत आहेत.

त्यासाठी सोसायट्या, चाळी, आणि बैठ्या घरांभोवती स्वतः जाऊन सांगतत आहेत. इतकं सगळं करीत असताना भाजी खरेदीसाठी मंडईत लोकांची गर्दी झाली अन ती पाहन योगेश यांनी मंडईतला बाजारच बंद केला आणि 'तुम्ही खूप गर्दी केली म्हणून मंडई मीच बंद केली' हे सांगण्यासाठी त्यांनी पुन्हा गल्लीबोळ पालथा घातला.

एवढ्यावरच ते थांबले नाहीत, या परिस्थिती आरोग्य खात्याच्या मदतीलाही ते धाऊन गेलेत, आपल्या प्रभागात रक्तदान शिबिर घेतलं; लोक रस्त्यावर पायही ठेवण्याचं धाडस करीत नाहीत, तेव्हा अनेकांना त्यांनी रक्तदानासाठी घराबाहेर काढलयं...गेल्या दोन दिवसांत शंभरजणांनी रक्तदान केलयं पण, त्यासाठी गर्दी होणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली.

योगेश हे महापालिकेत नेहमीच आंदोलनातून चर्चेत असतात. योगेश आणि आंदोलन हे समीकरणच तयार झाल्याने त्यांच्यावर 'स्टंटबाजी'चा शिक्का मारला जातो. पण, कोरोनाविरोधातील लढाईत योगेश याचं काम चर्चेच्या वर्तुळात फिरतयं पण, त्याला कुठच्याच शिक्क्याचा संसर्ग' होणार नाही, हेही योगेश कटाक्षाने पाहात आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख