पुणे शहर कॉंग्रेसनेच काढली  "इंदू सरकार'च्या विरोधातील हवा 

मधुर भांडारकर यांचा इंदू सरकार हा चित्रपट पुण्यातील काॅंग्रेसने अखेर `पास` केला. या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह चित्र किंवा वक्तव्य नसल्याचा साक्षात्कार अखेर कार्यकर्त्यांना झाला. मात्र राज्यातील इतर काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे.
पुणे शहर कॉंग्रेसनेच काढली  "इंदू सरकार'च्या विरोधातील हवा 

पुणे : "इंदू सरकार' या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह संवाद वा दृश्‍य दाखविलेली नाहीत. त्यामुळे चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याचा प्रश्‍न उरला नाही,''असे सांगत पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी "इंदू सरकार'ला आज हिरवा झेंडा दाखविला.

राज्यात इतर ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असताना पुण्यातील कार्यकर्त्यांचे हे वेगळेपण आज चर्चेत राहिले. 

निर्माता मधुर भांडारकर यांचा वादग्रस्त "इंदू सरकार' आज प्रदर्शित झाला. इंदिरा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह दृश्‍य आणि संवाद या सिनेमात असल्याचे सांगून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभर ठिकठिकाणी आंदोलने केली होती. शहर कॉंग्रेसने 15 जुलै रोजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली मधुर भांडारकर ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तेथे निदर्शने केली. त्याशिवाय थिएटर चालकांच्या संघटनेस पत्र देऊन हा चित्रपट प्रदर्शित करू नये असे आवाहन केले होते. 


भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनविण्यात आल्याचा आरोप करीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कल्याण, जळगाव, अकोला आदी ठिकाणी या चित्रपटाचे खेळ बंद पाडले. या उलट या चित्रपटावरून पहिल्यापासून आक्रमक असलेल्या पुणे कॉंग्रेसने मात्र या चित्रपटात आक्षेपार्ह काहीही नसल्याचे प्रमाणपत्र देऊन या आंदोलनातील हवाच काढली. 

पुणे शहर कॉंग्रेसचे चिटणीस विकी खन्ना यांच्यासह सोनाली मारणे, रमेश अय्यर, साहिल राऊत, संदीप मोकाटे, राजू साठे यांनी आज सकाळीच हा चित्रपट पाहिला. ""या चित्रपटात इंदिराजी गांधी यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह संवाद किंवा दृश्‍ये नाहीत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच अशी दृश्‍ये वगळण्यात आली. या चित्रपटाबद्दल आमचा आक्षेप संपला आहे,'' असे खन्ना यांनी सांगितले. शहर कॉंग्रेसच्यावतीने करण्यात येणारी निदर्शनेही रद्द करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील सर्व शो हे व्यवस्थित पार पडले. 

पोलिस आयुक्तांकडेही या चित्रपटाच्याविरोधात आज निदर्शने करण्याची परवानगी मागितली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने आक्षेपार्ह 14 दृश्‍य काढण्याचे आदेश भांडारकर यांना दिले होते, ती दृश्‍ये काढण्यात आली. त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याचा प्रश्‍नच आला नसल्याचे शहराध्यक्ष बागवे यांनी सांगितले. शहर कॉंग्रेसची या संदर्भात दुपारी बैठकही झाली. 

पहिल्या दिवशी पुण्यात या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण त्यात वाढ होईल, अशी अपेक्षा चित्रपटगृह चालकांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com