आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांतही गोंधळ : मुदत पूर्ण झाली एकाची आणि बदली दुसऱ्याची - Confusion in the transfer of IPS officers In Pune | Politics Marathi News - Sarkarnama

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांतही गोंधळ : मुदत पूर्ण झाली एकाची आणि बदली दुसऱ्याची

पांडुरंग सरोदे
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

स्थानिक पातळीवर झालेल्य या बदलांची नोंद  पोलिस महासंचालक कार्यालयात अद्ययावत न झाल्याने झोन चारचे उपायुक्ताला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे समजून देशमुख यांच्याच बदलीचे आदेश काढण्यात आले.

पुणे : मुदत पूर्ण झाली एकाची आणि बदली झाली दुसऱ्याची, असा प्रकार भारतीय पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत पुण्यात घडला आहे. त्यामुळे त्यात पुन्हा दुरुस्तीची वेळ सरकारवर आली. 

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना विलंब झाला आणि या बदल्यांचे आदेशही तुकड्याने काढण्यात आले. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले पण त्यांना नवीन नियुक्त्या मिळाल्या नाहीत. असे जवळपास 25 आयपीएस अधिकारी अजून प्रतिक्षाधीन आहेत.

पोलिस उपायुक्त आणि अधीक्षक दर्जांच्या बदल्यांचे वेळोवेळी आदेश काढण्यात आले. त्यात गेल्या आठवड्यात पुण्यातील परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांचीही बदली करून त्यांना प्रतिक्षाधीन ठेवण्यात आले होते. त्यांच्या जागी राहुल श्रीरामे यांची नियुक्ती केल्याचे त्या आदेशात म्हटले होते. परिमंडळ चारला नियुक्ती होऊन देशमुख यांना एक वर्ष व्हायच्या आधीच बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त झाले होते. पदावर दोन वर्षांची मुदत पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत आहेत. मात्र हा गोंधळ माहितीतील अभावामुळे झाल्याचे सांगण्यात येते.

देशमुख यांच्या आधी प्रसाद अक्कानवरु हे परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तपदी कार्यरत होते. तत्कालीन पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी त्यांची डिसेंबर 2019 मध्ये त्यांची बदली वाहतूक शाखेमध्ये करण्यात आली, तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त असलेले पंकज देशमुख यांना त्यांच्या जागी नेमले.

स्थानिक पातळीवर झालेल्य या बदलांची नोंद  पोलिस महासंचालक कार्यालयात अद्ययावत न झाल्याने झोन चारचे उपायुक्ताला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे समजून देशमुख यांच्याच बदलीचे आदेश काढण्यात आले. हा तांत्रिक गोंधळ दूर करून गृह विभागाने शुक्रवारी रात्री काढलेल्या आदेशामध्ये देशमुख यांची पुन्हा परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले. 

परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तपदी प्रियांका नारनवरे 
राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी रात्री काढलेल्या आदेशामध्ये परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तपदी प्रियांका नारनवरे यांची नियुक्ती केली आहे. नारनवरे या ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये पोलिस उपायुक्तपदी (मुख्यालय) कार्यरत होत्या. तर सध्याच्या परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख