पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुखांची चर्चा... इतर ठिकाणची ही आहेत नावे - abhinav deshmukh may appointed as Pune rural SP | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुखांची चर्चा... इतर ठिकाणची ही आहेत नावे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

अनेक अधिकाऱ्यांना मुंबई किंवा पुण्यात येण्याची इच्छा

पुणे : राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे सध्या वाहत असून त्यात पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची बढती निश्चित असल्याने त्यांची बदली होणार आहे. त्यांच्याजागी कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख आणि सोलापूरचे अधीक्षक मनोज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. गडचिरोलील उत्तम कामगिरी केलेल्या देशमुख यांचे पारडे जड असल्याचे सांगण्यात येत आहे. 

संदीप पाटील यांची पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून बढती होणार असून ते मुंबईत अतिरिक्त आयुक्त पदावर जाण्याची शक्यता आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता तर पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे.

काही नावांवरून पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल आणि गृह खाते यांच्यात मतभेद असल्याचे पोलिस वर्तुळात बोलण्यात येत आहे.  गणेशोत्सवात पोलिसांना मोठा ताण असतो. त्यामुळे गणेशोत्सव झाल्यानंतर बदल्या कराव्यात, असाही मतप्रवाह आहे. काहींच्या म्हणण्यानुसार 14 किंवा 17 आॅगस्ट रोजीच बदल्यांचे आदेश निघू शकतात.

नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी राजेंद्रसिंग, नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी कैसर खलीद यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे, तर मुंबई रेल्वे पोलीसच्या आयुक्तपदी भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता असलेले अमिताभ गुप्ता सध्या गृह खात्याचे प्रधान सचिव या पदावर काम करत आहेत. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्तपदी येतील, अशी शक्यता असलेले कृष्णप्रकाश सध्या पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये कायदा सुव्यवस्था विभागात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात सहमती झाल्यानंतर बदल्या जाहीर होतील. 14 आॅगस्टच्या संध्याकाळपर्यंत या बाबतचा निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर कायम राहतील अशी चिन्हे आहेत. सीआयडीचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, आशुतोष डुंबरे यांच्याही पुण्यातील नियुक्तीबद्दल चर्चा आहे. मात्र, या बदल्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, मुंबईतील पोलिस वर्तुळात याबाबत जोरात चर्चा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख