नगरमध्ये आज मुंडे कडाडणार आणि मुख्यमंत्री बरसणार!

नगरमध्ये आज मुंडे कडाडणार आणि मुख्यमंत्री बरसणार!

नगर : गेल्या महिनाभरापासून शहर व जिल्ह्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यानिमित्ताने अनेक घडामोडी घडल्या. दिवसा एक, रात्री दुसरे आणि दुसऱ्या दिवशी तिसरेच चित्र पाहण्यास मिळाले. अशा या निवडणुकीच्या प्रचाराची सांगताही अशाच कडक वातावरणात होत आहे. नगरमध्ये दुपारी अडीच वाजता सावेडी येथे राष्ट्रवादीच्या सभेत धनंजय मुंडे भाजपवर कडाडणार, तर त्याच वेळी भाजपच्या सभेत मुख्यमंत्री गांधी मैदानात आश्वासनांचा पाऊस पडणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सांगतेलाही राजकीय खेळ पाहण्यास मिळणार आहे.

निष्ठा, प्रतिष्ठा सर्व काही अलबेल

निवडणुकीत विजयासाठी सर्व काही अलबेल असते. प्रत्येकाचे एकच लक्ष्य ते म्हणजे विजयाचा गुलाल अंगावर घ्यायचा. मग त्यासाठी पक्षनिष्ठा, स्वतःची प्रतिष्ठा, नातंगोतं हे सर्व पणाला लावले जाते. याचे उदाहरण नगरच्या महापालिकेच्या निमित्ताने दिसून आले. आपल्याला उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी पक्षनिष्ठेला तिलांजली दिली. तर राजकीय पक्षांनी निष्ठावंतांना पाणी पाजले. वर्षानुवर्षे खांद्यावर झेंडे घेवून मिरणाऱ्यांना आणि नगरसेवक पदाचे स्वप्न पाहत असलेल्या कार्य़कर्त्यांना चुटकीसरशी बाजूला काढले. राजकारणाचा हा डाव असला, तरी समोरच्या व्यक्तीची स्थिती जाणून घेण्याची तसदी कोणीही घेतली नाही. प्रत्येकाला स्वतःचेच पडलेले. मुलाखती देताना जोरदार शक्तीप्रदर्शन करूनही आणि प्रत्येक कार्यक्रमास निष्ठावंत म्हणून मिरविणाऱ्यांची बत्ती या निमित्ताने गुल झालेली दिसली.

रात्रीतून आर की पार

निवडणुकीचा फंडा कसा रात्रीतून बदलतो, हे सर्वसामान्य एेकून होते. कार्यकर्ते तर हे कायमच अनुभवतात. मात्र सर्वसामान्यांना त्याचे फारसे देणे-घेणे नसते. केडगावमधील काॅंग्रेसचे उमेदवार भाजपने रात्रीतून पळविले. राजकारणाचा हा फंडा सर्वसामान्यांसमोर उघड झाला. राजकारणात काय भरोसा, हेच वाक्य प्रत्येकाच्या तोंडी आले. नगरमध्ये राजकीय भूकंप, अशाच मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळेच रात्री वैऱ्याची म्हणतात ती ही अशी. ही उक्ती या ठिकाणी तंतोतंत लागू पडली. आता पुढील दोन दिवसही अशीच स्थिती आहे. मतदान फिरविण्यासाठी रात्रभर जागता पहारा देणारे उमेदवार पाहण्यास मिळणार आहेत.

आज सांगता समारंभाच्या सभा

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सावेडीच्या भिस्तबाग चाैकात दुपारी २.३० वाजता सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काॅग्रेसचे स्टार प्रचारक असणार आहेत. याच वेळी भाजपची सांगता सभा गांधी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांच्यासोबतही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित राहणार आहे. त्यामुळे दोन्ही सभेत नेते काय बोलतात, एकमेकांवर आरोप करतात, की आश्वासनांची खिरापत वाटतात, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही सभांकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com