psi gets suspended after allegation | Sarkarnama

ग्रामस्थाला विनाकारण मारहाण करणारा फौजदार निलंबित                

संतोष शेळके
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

 करमाड, ता.12 : गावातील ग्रामस्थास विनाकारण झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात मध्यस्थ करायला गेलेल्या गावच्या उपसरपंचास उपनिरीक्षकाने शिवीगाळ केल्याने ग्रामस्थ व करमाड पोलिसात धुमचक्री उडाली. त्यानंतर हजारो ग्रामस्थांनी संतप्त होत ठाण्यासमोर धरणे दिले. शेवटी संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या निलंबन कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच प्रकरण शांत झाले. करमाड (ता.औरंगाबाद) येथे दुपारी एक वाजता ही घटना घडली. 

 करमाड, ता.12 : गावातील ग्रामस्थास विनाकारण झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात मध्यस्थ करायला गेलेल्या गावच्या उपसरपंचास उपनिरीक्षकाने शिवीगाळ केल्याने ग्रामस्थ व करमाड पोलिसात धुमचक्री उडाली. त्यानंतर हजारो ग्रामस्थांनी संतप्त होत ठाण्यासमोर धरणे दिले. शेवटी संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या निलंबन कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच प्रकरण शांत झाले. करमाड (ता.औरंगाबाद) येथे दुपारी एक वाजता ही घटना घडली. 

या प्रकरणात करमाड पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांचे पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह यांनी निलंबनाची कारवाईचे आदेश दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत निलंबन कारवाईची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आजिनाथ रायकर यांनी दिली. 

करमाड येथील दामु भावले या नागरिकास करमाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सोमवारी (ता.11) त्याच्या घरी जाऊन एका प्रकरणात रात्री आठ वाजता शिवीगाळ करीत घराच्या खिडकी व दरवाजास लाथा मारून नुकसान केले होते.

या घटनेची माहिती श्री. भावले यांनी गावातील ग्रामस्थांना दिली. त्यामुळे, या घटनेचा श्री. रोडगे यांना राग आला होता. त्यातच मंगळवारी (ता.12) श्री. रोडगे दुपारी जालना महामार्गावरून पोलीस ठाण्यात येत असताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दामू भावले हा गावातील काही ग्रामस्थाजवळ उभा दिसला. त्यामुळे श्री. रोडगे यांनी आपली चारचाकी बाजुला घेत काहीही न बोलता श्री.भावले यांना मारहाण सुरू केली.

त्यातच या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या उपसरपंच दत्ताभाऊ उकर्डे यांनाही रोडगे यांनी अपमानित करीत शिवीगाळ केली. काही वेळातच ही चर्चा संपूर्ण गावात पोहोचली. त्यामुळे करमाड ग्रामस्थांसह परिसरातील हजारो नागरिकांनी करमाड पोलीस ठाण्याकडे धाव घेत ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. यावेळी या जमावाने पोलीस अधिकाऱयांच्या मनमानी कारभाराचा विरोध करीत थेट निलंबनाची कारवाई मागणी केली. तोपर्यंत येथून कोणीच हलणार नसल्याची भुमीका घेत स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह यांनी घटनास्थळी येऊन निलंबनाचे आदेश देईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली. शेवटी पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांची समजुत काढत तात्काळ निलंबनाच्या कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले व करमाडचे पोलीस निरीक्षक आजिनाथ रायकर उपस्थित होते. 

अन्‌ बघता-बघता करमाड बंद 
घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण करमाडकरांना मिळाली. त्यामुळे जो-तो करमाड पोलीस ठाण्याकडे जातांना दिसत होता. तत्पूर्वी, पोलीस अधिकाऱ्याच्या या मुजोर वृत्तीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांसह इतर सर्व प्रतिष्ठाने बंद करण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख