तक्रारदाराच्या बहिणीकडे शरीरसंबंधाची फौजदाराची मागणी : खाकी वर्दीला झाले तरी काय?

तक्रारदाराच्या बहिणीकडे शरीरसंबंधाची फौजदाराची मागणी : खाकी वर्दीला झाले तरी काय?

नागपूर ः तक्रारदार युवकाच्या बहिणीला शारीरिक संबंधाची मागणी करणारा अजनी पोलिस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे. टेमगिरेवर नव्याने ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून तो मूळ गावीसुद्धा मिळून आला नाही. एका पीएसआय अधिकाऱ्याच्या घाणेरड्या कृत्यामुळे नागपूर शहर पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे शहर पोलिस दलात पारदर्शक कारभार आणि लोकाभिमूख पोलिसींग करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना संजय टेमगिरेसारखे पोलिस अधिकारी काळिमा फासत आहेत.

21 मे रोजी नवीन बाभुळखेडा येथील धोबीघाट येथे लग्नाच्या स्वागत समारंभात डीजेवर नाचत असताना धक्‍का लागल्याच्या कारणावरून आशुतोष बाबुलाल वर्मा (25) याचा आरोपी मनिष अशोक गवतेल (20), ललित उर्फ काल्या यांनी खून केला होता. या हल्ल्यात शूभम हा मध्यस्थी करीत असताना जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास अजनीचे पीएसआय संजय टेमगिरे याच्याकडे होता.

27 मे 13 जून दरम्यान टेमगिरे यांनी पीडित 25 वर्षीय तरुणीला फोन करून तिच्या भावाचे कपडे घेऊन पोलिस ठाण्यात बोलविले. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने तिला पोलिस ठाण्याबाहेर बोलावून रात्री उशीरापर्यंत तिला थांबवून ठेवले. 13 जून रोजी टेमगिरे यांनी पीडित तरुणीला सिनेमा पाहण्यासाठी बोलविले. त्याचप्रमाणे सिनेमाच्या तिकीटा आणि फोटो तरुणीच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविल्या. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी पीएसआय टेमगिरे यांच्यावर 354(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीएसआयची वादग्रस्त कारकिर्द 

संजय टेमगिरे याची आतापर्यंतची कारकिर्दच वादग्रस्त आहेत. त्याने 25 वर्षीय असहाय तरूणीला शारीरिक संबंधाची मागणी केली अन्यथा भावाला खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली होती. शरीरसंबंध ठेवल्यास किंवा चित्रपट बघायला येत असल्यास भावाला त्रास होणार नाही, असा दमही देण्यात आला होता. 

खाकीला झाले तरी काय? 

नुकताच सीताबर्डी वाहतूक पोलिस विभागाचा कर्मचारी सचिन हांडेने ऑन ड्युटी चंद्रपुरात दारूतस्करी केली होती. त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर प्रतापनगरातील पीएसआय घोडाम याने दोन कर्मचाऱ्याच्या मदतीने डॉक्‍टरला दहा लाखांची खंडणी मागितली होती. तर आता पीएसआय संजय टेमगिरेने तरूणीला चक्‍क शारीरिक संबंधाची मागणी केली. तर काही दिवसांपूर्वी एमडी तस्कर आबूशी संबंध ठेवणाऱ्या चार पोलिस निलंबित आहेत. त्यामुळे खाकीला झालेय तरी काय, असा सवाल विचारला जात आहे. 

दिलगिरी : या आधी प्रसिद्ध झालेल्या बातमीत फौजदार संजय नवनाथ टेमगिरी यांचा फोटो नजरचुकीने प्रसिद्ध झाला. त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिर आहोत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com