PSI नागरे...ज्यांनी 4 नक्षली हल्ले मोडून काढले आणि 7 नक्षलवाद्यांचे आत्मसर्मपण घडवले!  - psi amarnath nagare story | Politics Marathi News - Sarkarnama

PSI नागरे...ज्यांनी 4 नक्षली हल्ले मोडून काढले आणि 7 नक्षलवाद्यांचे आत्मसर्मपण घडवले! 

जगदीश पानसरे
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

अमरनाथ दिनकर नागरे सद्या औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

औरंगाबादः पोलीसात भरती झाल्यानंतर आठ वर्ष नागपूर, नाशिक सारख्याशहरी भागात ड्युटी केली. पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोस्टींग झाली. तीन वर्षांची मुलगी, पत्नी, आई-वडीलांना सोडून जाण्याची मानसिकता नव्हती. पण लष्करात असलेल्या माझ्या वडीलांनी हिमंत दिली. "काही होत नाही, धैर्याने संकटांचा सामना कर आणि चांगले काम करून ये'' असा धीर देत आर्शिवाद दिला आणि मी पोस्टींग स्वीकारली. 

तीन वर्ष नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सेवा बजावून पोलीस महासंचालक पदक पटकावणारे पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ दिनकर नागरे यांनी आपल्या या खडतर काळातील आठवणी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगत होते. 

तीन वर्षाच्या काळात नक्षलवाद्यांशी झालेली चकमक, अशिक्षित आदिवासी तरूणांना योग्य दिशा दाखवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, सरकारी योजनांचा आदिवासींना मिळवून दिलेला लाभ याविषयी भरभरून बोलतांना अमरनाथ नागरे म्हणाले, देशासाठी काही तरी करून दाखवण्याची जिद्द आणि उर्मी लष्कारातून निवृत्त झालेल्या वडील दिनकर नागरे यांच्याकडूनच मिळाली. राजीव गांधी पंतप्रधान असतांना श्रीलंकेत शांतीसेना पाठवण्याचा निर्णय झाला होता, तेव्हा माझे वडील लष्कराच्या तुकडीत होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच मी देखील नक्षलग्रस्त गडचिरोली भागात जाऊन चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. 

तीन वर्षाच्या कार्यकाळात आपल्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे पार्टीतील सहकारी जखमी किंवा दगावू नये याची सातत्याने काळजी घेतली. चारवेळा नक्षलवाद्यांशी समोरासमोर चकमक आणि सात नक्षलवाद्यांचे आत्मसर्मपण ही माझ्या कार्यकाळातील कामगिरी महत्वाची ठरली. या शिवाय जनजागृती, तरुणांना नक्षली कारवायांपासून परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यात मला बऱ्यापैकी यशही मिळाले ही माझ्यासाठी समाधानाची बाब होती. 

ऑगस्ट 2014 मध्ये गडचिरोली येथे पीएसआय म्हणून रूजू झालो. अेटापल्ली विभागातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या कसनपूर पोलीस स्टेशनअंतर्गत काम सुरू झाले. सात-आठ महिन्यातील चांगल्या कामगिरीमुळे मला इन्चार्जशीप मिळाली. नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाली की पंधरा जणांची आमची पार्टी घनदाट जंगलात मोहिमवर निघायची. कधी नक्षलवाद्यांशी समोरासमोर चकमक झडेल यांचा नेम नसायचा. 

एखाद्या भागातून टिप मिळाली की दोनशे किलोमीटपर्यंतच्या अतंरावर दीड तासात पोहचावे लागायचे. विशेष म्हणेज जंगलात एकदा कारवाईसाठी शिरलो की पाठीवर ओझे घेऊन दिवसभरात 35 किलोमीटरची पायपीट करावी लागायची. सर्तक राहत नक्षलींच्या मागावर रहायचे, पार्टीतील कोणत्याही सहकाऱ्याला ईजा न होऊ देता मोहिम यशस्वी करायची हे मोठे जिकरीचे काम होते. 

नक्षलवादी कुठे लपले आहेत याची अचूक माहिती मिळवण्यासाठी आम्हाला या भागात बरेच काम करावे लागले. त्यापैकी मुख्य म्हणजे गावातील आदिवासी तरूण, महिला, वयोवृध्दांचा विश्‍वास संपादन करणे. पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी आले आहेत, हेच त्यांना पटवून देणे मोठे कठीण काम होते. त्यासाठी पावणे दोन वर्षात आठ जनजागरण मेळावे घेतले. 

आधी गावातील तरूणांमध्ये विश्‍वास निर्माण केला आणि त्यांच्या मार्फत गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले. एकीकडे आदिवासी तरुणांकडून मिळालेल्या टीपनूसार कारवाई करत नक्षलवादी कारवायांना आळा घालणे, भरकटलेल्या तरूणांना योग्य दिशा दावून त्यांना शरण येण्यास भाग पाडणे हे महत्वाचे काम आम्ही केले ते जनजागृतीच्या जोरावरच. 

जीवाची भिती, अज्ञान आणि हाताला रोजगार नसल्यामुळे आदिवासी तरूण मोठ्या प्रमाणात नक्षली कारवायांकडे वळाले. तेंदूपत्ता, बांबू पत्ता विकूनच बहुतांश आदिवासी आपल्या कुटुंबाचा उर्दनिर्वाह करतात. एवढ्यावर भागत नसल्यामुळे आणि नक्षलवाद्यांना साथ दिली तर जास्त पैसा मिळेल, या आशेपोटी हे तरूण नक्षलवादाकडे आढेले गेले. 

केवळ नक्षली कारवायांना आळा घालणे हाच सरकारचा हेतू नाही, तर अशिक्षित आदीवासी समाजाला न्याय आणि त्यांच्या हक्काच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे महत्वाचे होते. त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली, तरुणांसाठी गावांत लायब्ररी सुरू केली, स्पर्धा परिक्षांची पुस्तके उपलब्ध करून देत त्यांना नक्षलवादा पासून परावृत्त केले.

त्यामुळे आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीरांचे आयोजन केले. गडचिरोलीहून डॉक्‍टरांचे पथक बोलावून तपासण्या केल्या. 52 आदिवासी तरूणांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवून रक्तदान केल्यानंतर आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्‍वास वाटू लागला. 

1996 मध्ये एसआरपी कंपनीची गाडी उडवण्यासाठी केलेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये घोटसूर ते कसनपूर हा रस्ता वीस वर्षांपासून बंद होता. गावकऱ्यांच्या मदतीने रस्ता तयार करून या दरम्यानची नऊ गावे पुन्हा एकदा बस सेवेनी आम्हाला जोडता आली. ग्रामभेट, नाकाबंदीच्या दरम्यान आदिवासी लोकांचे प्रश्‍न जवळून पाहता आले, त्यांचे दुःख जाणून घेत काही अंशी ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सरकारच्या मदतीने केला. 

नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कार्य केल्याची दखल घेत राज्य सरकारने मला पंधरा ऑगस्ट रोजी पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित केले. नक्षलग्रस्त भागात जाण्याची मानसिकता नव्हती, पण तीन वर्षात तिथे काम केल्याचे आज निश्‍चितच समाधान असल्याचे अमरनाथ नागरे सांगतात.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख