Protocol War May Haunt Chandrapur Mayor Cup Event | Sarkarnama

चंद्रपूर महापौर चषकात रंगणार 'प्रोटोकॉल'ची कुस्ती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महापौर चषक 2020 चे आयोजन केले आहे. उद्यापासून या चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून संपूर्ण चषकावर 'प्रोटोकॉल'चे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत

चंद्रपूर : चंद्रपुरातील महापौर चषकाचा वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कुठलाही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही. एव्हाना, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना नाव टाकण्यासंदर्भात विचारणाही करण्यात आली नाही. हाच धागा पकडून पालकमंत्र्यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे महापौर चषकात आता प्रोटोकॉलची चांगलीच कुस्ती रंगणार आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महापौर चषक 2020 चे आयोजन केले आहे. उद्यापासून या चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून संपूर्ण चषकावर 'प्रोटोकॉल'चे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. उद्‌घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना देण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्र्यांनी थेट महापौरांवर एफआयआर दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. मला न विचारता पत्रिकेत नाव टाकण्यात आले आहे. जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचण्यात आला आहे. त्यामुळे महापौरांविरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

मनपा आयुक्त संजय काकडे यांनी आपण राजशिष्टाचारानुसार 'फायनल' केलेली पत्रिका मंजूर न करता महापौरांनी स्वत:च्या मर्जीने पत्रिका तयार केली, असे सांगून या सर्व प्रकरणातून आपली सुटका करून घेतली आहे. महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 14 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत महापौर चषक 2020 चे आयोजन केले आहे. या स्पर्धा गांधी चौकातील मनपाच्या पटांगणावर, तर काही स्पर्धा विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेत होणार आहेत. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता उद्‌घाटन होणार आहे. 

या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्‌घाटक म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अध्यक्षस्थानी सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार बाळू धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नागो गाणार, आमदार अनिल सोले, आमदार रामदास आंबटकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर राहुल पावडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार नाना श्‍यामकुळे, जिल्हा परिषद सदस्य देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाझारे यांच्या नावांचा समावेश आहे.

प्रोटोकॉलनुसार उद्‌घाटक म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मान मिळणे बंधनकारक आहे. मात्र, केवळ आपल्या पक्षातील नेत्यांना खूष करण्यासाठी हा मान हंसराज अहीर यांना देण्यात आला. भोंगळे, पाझारे ते कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना त्यांना स्थान देण्यात आले. तर, स्वपक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून शर्मा यांना पाचारण केले आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी हंसराज अहीर राहणार आहेत, तर सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे. उर्वरित सर्व मान्यवरांची नावे कायम ठेवण्यात आली आहेत. मूळात ही निमंत्रण पत्रिकाच प्रोटोकॉलनुसार नाही. पालकमंत्र्यांना उद्‌घाटनाचा मान देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पालकमंत्री याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात महापौर राखी कंचर्लावार यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख