In Prof. Saibaba case there was pressure from international organisations | Sarkarnama

प्रा. साईबाबा प्रकरण : देशविदेशातून आला होता गृह खात्यावर दबाव

सुरेश नगराळे:सरकारनामा  ब्युरो 
गुरुवार, 9 मार्च 2017

प्रो. साईबाबा अडचणीत आल्याचे लक्षात येताच देशविदेशातील त्याच्या समर्थकांनी माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील, तसेच तपास अधिकाऱ्यांना सुमारे 30 हजार पत्रे पाठवून त्याच्या बचावाचा प्रयत्न केला होता.

गडचिरोली : नक्षल्यांना मदत व देशविरोधी कारवाया करण्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेले प्रो. जी. एन. साईबाबा यांच्या बचावासाठी देशविदेशातील त्यांच्या समर्थकांनी चौकशीदरम्यान तब्बल 30 हजार पत्र पाठवून गृहखात्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली. पोलिसांनी साईबाबाला पहिल्यांदा अटक केल्यानंतर ही पत्रे पाठवण्यात आली होती.

माओवादी संघटनांचा मास्टर माईंड मानला जाणारा व दिल्ली विद्यापीठातील रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक असलेला प्रो. साईबाबा आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिचित होता. त्याचे माओवाद्यांसोबतच आतंकवाद्यांसोबतही संबंध असल्याचे पोलिस तपासात सिद्ध झाले. अहेरीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास बावचे यांनी संबंधांचा पाठपुरावा करत साईबाबाविरोधात सबळ पुरावे गोळा केले होते.

 या पुराव्यांमुळे प्रो. साईबाबा अडचणीत आल्याचे लक्षात येताच देशविदेशातील त्याच्या समर्थकांनी माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील, तसेच तपास अधिकाऱ्यांना सुमारे 30 हजार पत्रे पाठवून त्याच्या बचावाचा प्रयत्न केला होता. आबांना तर पत्रातून विनवणी करण्यात आली होती. मात्र, गृहखात्याने व आबांनी या पत्रांची फारशी दखल घेतली नाही. उलट साईबाबांचे धागेदोरे किती खोलवर पोहोचले आहे. याचाही तपास सुरू केला असता विदेशातील सामाजिक संस्था, मानवाधिकार आयोगाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे आढळून आले.

 प्रो. साईबाबांचे माओवादी संघटनेशी संबंध नाही. ते एक चांगले प्राध्यापक असून हुशार, बुद्धिवंत तसेच 90 टक्के अपंग असल्याने पोलिसांनी नाहक त्यांना अडकवू नये अशा प्रकारचा मजकूर असलेली 30 हजार पत्रे प्राप्त झाली होती; परंतु आपण कुठल्याही दबावाला न घाबरता या प्रकरणाचा शेवट केल्याचे तपास अधिकारी सुहास बावचे यांनी सांगितले. 

गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा यास ऑगस्ट 2013 मध्ये महेश तिरकी व पांडू नरोटे या दोन युवकासह अहेरी येथे अटक केली होती. हेम मिश्राच्या माहितीवरून पोलिसांनी नंतर सप्टेंबर 2013 मध्ये प्रशांत राही यास अटक केली. 
प्रा. साईबाबाने माओवादी नेता नर्मदाक्का यांना भेटण्यासाठी जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा याला अबुजमाड पहाडावर जाण्यास सांगितले होते. मात्र, महेश तिरकी व पांडू नरोटे यांच्याकडे पोलिसांना काही चिठ्ठ्या व पाच लाख रुपये रोख मिळाले होते. त्यातून या प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांच्या लक्षात आले. गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत प्रो. साईबाबांच्या निवासस्थानावर छापा टाकून महत्त्वाचे कागदपत्र हस्तगत केल्याने शिक्षेसाठी मोठी मदत झाली.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख