Problems for Arhar Producers | Sarkarnama

तूरउत्पादक शेतकऱ्यांसाठी अडथळ्यांची शर्यत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जानेवारी 2019

नाफेडने तूरखरेदीचा मुहूर्त काढला असला तरी नोंदणीसाठी मात्र दिलेला कालावधी अपुरा आहे. केवळ नऊ दिवसांत ऑनलाइन नोंदणी करायची असताना नोंदणी केंद्र मात्र सुरू झालेली नाहीत. जिल्ह्यात बारापैकी केवळ चार केंद्रांनाच लॉगिन आयडी मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी हेलपाटे व निराशाच पदरी पडण्याची शक्‍यता अधिक आहे.

अमरावती : नाफेडने तूरखरेदीचा मुहूर्त काढला असला तरी नोंदणीसाठी मात्र दिलेला कालावधी अपुरा आहे. केवळ नऊ दिवसांत ऑनलाइन नोंदणी करायची असताना नोंदणी केंद्र मात्र सुरू झालेली नाहीत. जिल्ह्यात बारापैकी केवळ चार केंद्रांनाच लॉगिन आयडी मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी हेलपाटे व निराशाच पदरी पडण्याची शक्‍यता अधिक आहे.

महाराष्ट्र स्टेट को आपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने 25 जानेवारीस जारी केलेल्या आदेशात तुरीच्या ऑनलाइन नोंदणी व खरेदीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. नोंदणीचा कालावधी 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी, असा तर 7 फेब्रुवारीपासून खरेदी सुरू होणार आहे. जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगला हे पत्र 28 जानेवारीस मिळाले. यादरम्यान तुरीच्या नोंदणी व खरेदीसाठी बारा केंद्र राज्य मार्केटिंगकडे प्रस्तावित करण्यात आली. पैकी केवळ चार केंद्रांनाच लॉगिन आयडी मिळाला. उर्वरित आठ केंद्रांच्या आयडीसाठी स्थानिक पातळीहून हालचाली सुरू आहेत, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

जिल्ह्यातील चांदूररेल्वे, तिवसा, दर्यापूर व धारणी या केंद्रांना आयडी मिळाले आहेत. तर अचलपूर, नांदगाव खंडेश्‍वर, अंजनगावसुर्जी या जिल्हा मार्केटिंगच्या व चांदूरबाजार, वरुड, मोर्शी, धामणगावरेल्वे, अमरावती या विदर्भ मार्केटिंगच्या केंद्रांना आयडी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरिपात १ लाख १२ हजार ८१३ हेक्‍टर क्षेत्रात तुरीची पेरणी आहे. हवामान व नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनाची सरासरी घसरली आहे. एकरी दोन पोत्यांची सरासरी शेतकऱ्यांच्या हाती लागली आहे. आर्थिक चणचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराचा सहारा शोधला, मात्र हमीदरापेक्षाही कमी दर मिळाल्याने निराशाच पदरी पडली. स्थानिक बाजारपेठेत सोमवारी (ता.२८) तुरीला ४००० ते ५३०० रुपये भाव मिळाला. शासनाने ५६७५ रुपये हमीदर निश्‍चित केला आहे. शासकीय खरेदीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांची मागणी उशिराने का होईना शासनाने पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी केंद्रे तातडीने सुरू केलेली नाहीत. शेतकऱ्यांकडे आता उणेपुरे नऊ दिवस नेंदणीसाठी आहेत. या कमी कालावधीत नोंदणी कशी करायची व विक्री कशी करायची? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आ वासून उभा ठाकला आहे. त्यामुळेच शासनाला खरेच तूर खरेदी करायची आहे का? असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची केंद्रे : चांदूररेल्वे, तिवसा, दर्यापूर, धारणी (सुरू)
प्रतीक्षेत : अचलपूर, नांदगाव खंडेश्‍वर, अंजनगावसुर्जी.
विदर्भ मार्केटिंग फेडरेशन : चांदूरबाजार, वरुड, मोर्शी, धामणगावरेल्वे, अमरावती.

खुल्या बाजारातील भाव : ४०००-५३००
हमीदर ५६७५

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख