Problem Before Congress in Kamathai Assembly Constituency | Sarkarnama

कामठीत कॉंग्रेससमोर उमेदवारीचा पेच

वीरेंद्रकुमार जोगी
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

येत्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे विद्यमान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याची तयारी करीत आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसला अद्याप तगडा उमेदवार सापडला नसल्याने चांगलाच पेच निर्माण झाला आहे. दिवसागणिक कॉंग्रेसचे कार्यकर्ते भाजपत जात आहेत. त्यामुळे स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडे केली जात आहे. शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले यांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांना टक्कर देण्यासाठी दंड थोपटले आहेत.

नागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे विद्यमान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याची तयारी करीत आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसला अद्याप तगडा उमेदवार सापडला नसल्याने चांगलाच पेच निर्माण झाला आहे. दिवसागणिक कॉंग्रेसचे कार्यकर्ते भाजपत जात आहेत. त्यामुळे स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडे केली जात आहे. शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले यांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांना टक्कर देण्यासाठी दंड थोपटले आहेत.

नागपूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री असल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्ह्यात दबदबा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बावनकुळे यांच्या पाठीशी आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची तार जुळली आहे. जनता दरबार घेऊन ते मतदारांवर पकड मजबूत करीत आहेत. मात्र, मागील काही घडामोडी कॉंग्रेससाठी चैतन्य निर्माण करणाऱ्या आहेत. कामठी मतदारसंघात स्थानिकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी समोर आली आहे. मात्र, याच वेळी उमेदवारीत आघाडीवर असलेले सुरेश भोयर यांचे अनेक समर्थक भाजपमध्ये गेल्याने ते बॅकफूटवर आले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. 

मौदा तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र नव्या चेहऱ्याचा आग्रह धरला आहे. सुनील केदार यांनी कामठीतून लढावे, अशीही अनेकांची इच्छा आहे. राजेंद्र मुळक यांनी कामठी मतदारसंघात सातत्त्याने काम केले असते तर या वेळी उमेदवारीसाठी त्यांचा प्रबळ दावा राहिला असता, असे कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते उघडपणे बोलतात. याशिवाय हुकूमचंद आमदरे, शकूर नागानी हेदेखील कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. गेल्या 27 ऑगस्टला नागपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील इच्छुक भाजप उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी अनेकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव समोर केले. परिणामी बावनकुळे यांचा उमेदवारीसाठीचा दावा अधिक मजबूत झाला आहे.

गोडबोलेंना कॉंग्रेसचे पाठबळ?
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनीही निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. ते कॉंग्रेस नेत्यांच्या संपर्कात असून दिल्लीतून त्यांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांचा उत्साह वाढल्याचे दिसते. बच्चू कडू यांनी नुकताच कामठीच्या वडोदा येथे 'प्रहार'चा कार्यकर्ता मेळावा घेतला. यात भाजप कार्यकर्त्यांनी 'प्रहार'मध्ये प्रवेश घेतला. हा कार्यक्रम देवेंद्र गोडबोले यांनी आयोजित केल्याची चर्चा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख