युतीच्या अधिकृत उमेदवारांविरुध्द तनवाणी, शिंदे, वैद्य यांची बंडखोरी

युतीच्या अधिकृत उमेदवारांविरुध्द तनवाणी, शिंदे, वैद्य यांची बंडखोरी

औरंगाबाद : राज्य पातळीवर शिवसेना-भाजपची महायुती झाली असली तरी जिल्ह्यातील अनेक मतदारसंघामध्ये या दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. औरंगाबाद पूर्वमधून भाजपच्या अतुल सावे यांच्या विरोधात शिवसेनेचे राजू वैद्य, पश्‍चिममध्ये शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपचे राजू शिंदे आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात विशेषत शहरातील तिन्ही मतदारसंघात बंडखोरीची लागण झाली. भाजपचे राजू शिंदे, किशनचंद तनवाणी यांच्यासह शिवसेनेचे राजू वैद्य बंडखोरी करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण युतीचे स्थानिक नेते हे संभाव्य बंड थंड करण्यात यशस्वी होतील असे बोलले जात होते. बंडखोरांनी देखील आपले पत्ते शेवटपर्यंत उघड न होऊ देता अखेर उमेदवारी अर्ज दाखल केलेच. तनवाणी, वैद्य आणि शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन करत युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरुध्द दंड थोपटले आहेत. युती झाल्यामुळे गेली अनेक वर्ष आपापल्या मतदारसंघामध्ये या तिन्ही इच्छूकांनी केलेली जोरदार तयारी व्यर्थ जाणार म्हणून त्यांचे समर्थक व कार्यकर्ते हवालदिल झाले होते. 

अपक्ष उमेदवारी दाखल करण्या संदर्भात तनवाणी, वैद्य, शिंदे यांच्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव होता असे सांगितले जाते. यापैकी अनेकजण काल दिवसभर नॉटरिचेबल असल्यामुळे त्यांच्या भूमिके विषयी शंका व्यक्त केल्या जात होत्या, अखेर आज त्या खऱ्या ठरल्या. बंडखोरी केलेले वैद्य, तनवाणी, शिंदे यांची उपद्रव शक्ती अधिक असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतात ? की मग माघार घेतात यावर युतीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. पण या तिघांनी आपली उमेदवारी कायम ठेवली तर मात्र सावे, शिरसाट, जैस्वाल यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com