Priyanka & Indira Gandhi | Sarkarnama

काँग्रेस कार्यकर्ते प्रियांकामध्ये इंदिरा गांधींना पाहतात

सरकारनामा
बुधवार, 23 जानेवारी 2019

काँग्रेस  पक्षाकडे त्यांच्या इतके ग्लॅमर असलेला आणि गर्दी खेचणारा नेता सध्या तरी नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या त्या काँग्रेस  पक्षाचा हुकमाचा एक्का ठरू शकतात.

 

नवी दिल्ली :  कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपल्या भगिनी प्रियांका गांधी वढेरा यांना अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते प्रियांका यांच्यात कै. इंदिरा गांधी यांची छबी पाहतात.

प्रियांका  तरुण कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांची चेहरेपट्टी, बोलण्या-वागण्याची पद्धत एवढेच काय साडी नेसण्याची पद्धतही कार्यकर्त्यांना इंदिरा गांधींची आठवण करून देते. त्यांच्या वक्तृत्वावरही इंदिराजींच्या भाषणांचा प्रभाव आहे. गांधी घराण्याचे वलय आणि कार्यकर्त्यांची मने जिंकून घेण्याऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रियांका  येत्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक ठरणार आहेत हे नक्की आहे.

47 वर्षांच्या प्रियांका गांधी वयाच्या नवव्या वर्षांपासून आपले वडील कै. राजीव गांधी यांच्या समवेत अमेठी, रायबरेलीच्या दौऱ्यावर जात असत. सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघाची जबाबदारी त्या गेल्या दोन निवडणुकांपासून त्या पूर्णपणे सांभाळत आहेत. गेल्या वेळी अमेठीतही राहुल गांधींचा प्रचार करताना स्मृती इराणी यांची दमछाक केली होती.

सोनिया गांधी यावेळी लोकसभेची निवडणूक लढविणार नाहीत अशी काँग्रेस  वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे गेली वीस-पंचवीस वर्षे सक्रिय राजकारणात असलेल्या प्रियांकांना कॉंग्रेस रायबरेलीतून उमेदवारी देऊ शकते. त्यांच्या उमेदवारीचा प्रभाव आजूबाजूच्या लोकसभा मतदारसंघावर निश्‍चितपणे जाणवू शकतो.

राहुल गांधी यांच्या या मास्टरस्ट्रोकमुळे पक्षाला दुहेरी फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांची आघाडी झाली आहे. मायावती आणि अखिलेशसिंह यांनी रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेस  पक्षाला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला असला तरी आघाडीमध्ये कॉंग्रेसला समाविष्ट केलेले नाही.

त्यामुळे उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या आघाडीने भाजपच्या गोटात घबराट निर्माण केली आहे तर काँग्रेससाठीही भूकंप झाल्यासारखीच परिस्थिती आहे. सपा-बसपा युतीमुळे कॉंग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशात 80 पैकी 4 जागा मिळणेही अवघड होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.

आता उत्तर प्रदेशची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियांका गांधी यांच्याकडे आली आहे. प्रियांका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेशचा भाग सोपविण्यात आलेला आहे. या भागात 27 जिल्हे, 30 लोकसभा मतदारसंघ आणि 147 विधानसभा मतदारसंघ आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघ प्रियांका गांधींच्या कार्यक्षेत्रात येतो. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर हा पूर्वीचा लोकसभा मतदारसंघही पूर्व उत्तर प्रदेशातच येतो. निवडणुकीच्या दरम्यान आपल्या करिष्म्याच्या जोरावर प्रियांका गांधी या दोन नेत्यांना उत्तर प्रदेशात अडकून ठेवू शकतात.

काँग्रेसचे पानिपत होण्यापासून रोखण्याचे आव्हान प्रियांकाच्या समोर राहील. मात्र देशभरात त्यांच्या सभांचा उपयोग काँग्रेस पक्षाला निश्‍चित होईल. काँग्रेस पक्षाकडे त्यांच्या इतके ग्लॅमर असलेला आणि गर्दी खेचणारा नेता सध्या तरी नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या त्या कॉंग्रेस पक्षाचा हुकमाचा एक्का ठरू शकतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख