prithvirajbaba vs atulbaba | Sarkarnama

पृथ्वीराजबाबांविरुद्ध अतुलबाबांना ताकद ; भाजपला हवा आमदार ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 जुलै 2017

मोदी लाटेत राज्यभर यश मिळालेतरी भाजपला सातारा जिल्ह्यात एक आमदारही निवडून आणता आला नाही. पाटण तालुक्‍यात तर भाजप उमेदवाराला 2 हजार मतेही मिळवता आली नाहीत. सातारा हा भाजपच्यादृष्टीने कुमकुवत जिल्हा आहे. त्यामुळे येथील पक्ष बळकटीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. अतुल भोसले हे आमदारकीला भाजपला यश मिळवून देऊ शकतात, असा विश्‍वास असल्याने त्यांना विठ्ठल रुक्‍मीणी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. 

सातारा : भारतीय जनता पक्षाने कऱ्हाड दक्षिणमध्ये लक्ष केंद्रीत केले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येथील युवा नेते अतुल भोसले यांच्यावर विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. अतुल भोसलेंना बळ देताना सातारा जिल्ह्यात पक्षाचे खाते उघडावे व एक आमदार मिळावा, अशी रणनिती आहे. 

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ हा तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी तब्बल 32 वर्षे आमदारकी गाजवली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उंडाळकरांना कॉंग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाणांसाठी बाजूला ठेवले. त्यामुळे उंडाळकरांनी अपक्ष निवडणूक लढली. त्याच दरम्यान, अतुल भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षातून पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात निवडणुक लढविली. पण, त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे आता आगामी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष अतुल भोसलेंच्या माध्यमातून कऱ्हाड दक्षिणसाठी पेरणी करत आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाची वाताहत सुरू आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे तब्बल 22 सदस्य होते. पण यावेळेस झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत कॉंग्रेसेचे केवळ सात सदस्य निवडुन आले. सातारा विधानसभा मतदारसंघात त्यांना निटसे उमेदवारही मिळाले नव्हते, अखेरच्या क्षणी कॉंग्रेसने कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात अब्रू जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली होती. त्यामुळे तेथून त्यांचे दोन उमेदवार निवडून आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ टार्गेट करत येथून अतुल भोसले यांना सातत्याने ताकद देण्याचे काम सुरू केले आहे. सुरवातीला त्यांना राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून घेतले आता तर पंढरपूर येथील विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्षपद दिले आहे. मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक आणि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून ताकद मिळत आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी निवडणुकीत स्वकियांबरोबरच राष्ट्रवादी आणि भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख