अशोक चव्हाणांच नाव पहिल्या यादीत....पृथ्वीराज यांचा निर्णय़ होईना

अशोक चव्हाणांच नाव पहिल्या यादीत....पृथ्वीराज यांचा निर्णय़ होईना

नवी दिल्ली ः पितृपक्ष संपताच कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेत्यांसोबतच विद्यमान आमदारांना; तसेच पाचही कार्याध्यक्षांना रिंगणात उतरवले. सत्ताधाऱ्यांच्या आमीषाला बळी न पडणारे निष्ठावंत असा निकष कॉंग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर करताना लावला आहे.

कॉंग्रेसने पहिल्या यादीमध्ये लोकसभा निवडणूक लढविलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि के. सी. पाडवी यांना विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहे. सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या वारसदारांनाही कॉंग्रेसने पुन्हा संधी दिली. मात्र, विद्यमान आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा कॉंग्रेसने केली नसल्यामुळे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्‍यता आहे. स्वतः पृथ्वीराज चव्हाण मात्र विधानसभेसाठी आग्रही आहेत.

शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये येऊन लोकसभेत महाराष्ट्राचे एकमेव कॉंग्रेस खासदार बनलेले बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी वरोरा मतदारसंघातून पत्नी प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी पदरात पाडून घेतली.

कॉंग्रेसने भोकर आणि नवापूर (अ. जा.) या दोन मतदारसंघांमधील विद्यमान आमदारांना म्हणजेच अमिता चव्हाण आणि सुरूपसिंह नाईक यांच्याऐवजी कुटुंबातीलच अशोक चव्हाण आणि शिरीष नाईक यांना उमेदवारी दिली; तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांच्यासह यशोमती ठाकूर (तेवसा), केंद्रीय कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख असलेले आणि प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत (उत्तर नागपूर-अ. जा.) मुजफ्फर हुसेन (मीरा भाईंदर), बसवराज पाटील (औसा), डॉ. विश्वजित पतंगराव कदम (पळूस-कडेगाव) या पाचही कार्याध्यक्षांना जनादेश मिळविण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या कन्या व विद्यमान आमदार वर्षा गायकवाड (धारावी -अ. जा.) यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. यातील यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांच्यासोबतच लातूर शहर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळालेले मावळते आमदार अमित देशमुख हे अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे सचिवदेखील आहेत.
विधान परिषदेत आमदार असलेले भाई जगताप यांना कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. मात्र याच सभागृहाचे आणखी एक आमदार सतेज पाटील यांना विधानसभेसाठी पक्षाने संधी न देता त्यांच्याच कुटुंबातील ऋतुराज संजय पाटील यांना कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com