Prithviraj Chavan missing from posters in Kannad | Sarkarnama

कॉंग्रेस नगराध्यक्षांच्या स्वागत बॅनरवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गायब 

संजय जाधव 
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या हाताला धोरण लकवा झाला होता.  विकास कामांच्या कोणत्याच फाईलवर त्यांनी त्यावेळी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे नगरपालिका व शहराचे मोठे नुकसान झाले.

-नगराध्यक्ष संतोष कोल्हे

कन्नडः  कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज कन्नडमध्ये दाखल झाली. या यात्रेचे जंगी स्वागत शहरात करण्यात आले. कॉंग्रसेचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी संपुर्ण शहरात स्वागतपर बॅनर लावले. पण या बॅनरमधून माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे फोटो गायब असल्यामुळे शहरात व तालुक्‍यात याची चर्चा रंगली होती. 

एवढेच नाही तर जाहीर सभा व जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कन्नडमध्ये आलेल्या कॉंग्रेस नेत्यांच्या वर्तमानपत्रांमधून प्रसिध्द झालेल्या जाहिरातींमधून देखील पृथ्वीराज चव्हाण यांना वगळण्यात आले. त्यामुळे नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांना पृथ्वीराज चव्हाणांचे एवढे वावडे का? अशी चर्चा सभास्थानी सुरू झाली होती. 

शहरातील गिरणी ग्राउंड येथे संपन्न झालेल्या सभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील या दिग्गजांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ही उपस्थित राहणार होते, मात्र ते आलेच नाही. या मागे स्वागत बॅनर आणि स्थानिक वृत्तपत्रांमधील जाहिरातीत फोटो नसल्यामुळेच चव्हाण नाराज झाल्याचे बोलले जाते. 

पृथ्वीराज चव्हाणांमुळे शहराचे नुकसान- कोल्हे 

नगराध्यक्ष कोल्हे यांनी शहरभर लावलेल्या बॅनरवरून पृथ्वीराज चव्हाण गायब का? यासंदर्भात थेट संतोष कोल्हे यांच्याकडे विचारणा  केली असता ते म्हणाले, " गेल्या वीस वर्षांपासून मी कॉंग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे व गेल्या पंधरा वर्षांपासून नगराध्यक्ष पदावर कार्यरत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या हाताला धोरण लकवा झाला होता. "

" विकास कामांच्या कोणत्याच फाईलवर त्यांनी त्यावेळी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे नगरपालिका व शहराचे मोठे नुकसान झाले. ते एक चांगले प्रशासकीय अधिकारी आहे, त्यांनी प्रशासनातच काम करावे,' अशी टिका केली. एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मनात असलेला राग कोल्हे यांनी बॅनरवरच्या माध्यमातून काढल्याचे दिसते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख