पृथ्वीराज विरुद्ध उदयनराजे सामना व्हावा, ही तर चव्हाण विरोधकांची इच्छा!

पृथ्वीराज विरुद्ध उदयनराजे सामना व्हावा, ही तर चव्हाण विरोधकांची इच्छा!

नवी दिल्ली ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या (ता. 26) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चाचपणी कॉंग्रेसने सुरू केल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून कळते.

साताऱ्याच्या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या वृत्तास कॉंग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दुजोरा दिला. कालपासून पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत असून, आज त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, साताऱ्यातील उमेदवारीबाबत स्वतः चव्हाण यांनी बोलण्याचे टाळले.

सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश पातळीवरील नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आग्रही आहेत; परंतु उदयनराजे भोसले यांच्याविरुद्धच्या या लढाईसाठी अद्याप खुद्द चव्हाण यांची मानसिक तयारी झाली नसल्याचे निरीक्षणही या सूत्रांनी नोंदवले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पूर्ण पाठिंबा मिळेल काय, अशी साशंकता त्यांना असल्याचे बोलले जाते.

या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या छाननी समितीच्या आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विधानसभांसोबतच साताऱ्याबाबतही निर्णय होऊ शकतो. याआधी छाननी समितीच्या बैठकीत सुमारे 70 हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित नावांवर उद्या चर्चा होईल.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याआधी 20 सप्टेंबरला 50 उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे म्हटले होते; परंतु विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास चार ऑक्‍टोबरपासून सुरवात होणार असल्याने कॉंग्रेसची उमेदवारांची यादी उशिरा जाहीर होईल, असे कळते. आधीच नावे जाहीर झाल्यास पक्षाच्या उमेदवारांच्या मागे सत्ताधाऱ्यांकडून चौकशीचा ससेमिरा लावला जाऊ शकतो, अशी भीती कॉंग्रेसच्या नेत्यांना आहे. याशिवाय, सत्ताधारी भाजप-शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर झाल्यास त्या पक्षांच्या नाराजांनाही आयत्या वेळी उमेदवारी देण्याची रणनीतीही कॉंग्रेसने आखली आहे.

गांधी जयंतीला राहुल वर्ध्यात
कॉंग्रेसने दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी कार्यक्रमांचे नियोजन केले असून, यानिमित्ताने विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये पदयात्रेच्या माध्यमातून प्रचाराचाही मुहूर्त साधण्याचे कॉंग्रेस नेतृत्वाचे नियोजन असल्याचे कळते. याअंतर्गत राहुल गांधी दोन ऑक्‍टोबरला वर्धा येथे पदयात्रा काढतील, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीपासून पदयात्रा काढतील. प्रियांका गांधी या सोनियांसोबत पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com