Prithviraj Chavan Criticism on Financial Policies of the Government | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

पक्षाऐवजी भाजपने कारखान्यात महाभरती करावी : पृथ्वीराज चव्हाण

उत्तम कुटे
रविवार, 15 सप्टेंबर 2019

आपल्या पक्षात महाभरती करण्याऐवजी भाजपने ती कारखान्यात करावी. भयानक मंदीच्या काळात ढासळत्या अर्थव्यवस्थेला ते योग्य ठरेल, असा टोला कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृ्थ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता.१५) पिंपरी-चिंचवडमध्ये लगावला. रोजगार व अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर राज्य सरकार फेल ठरले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

पिंपरी : आपल्या पक्षात महाभरती करण्याऐवजी भाजपने ती कारखान्यात करावी. भयानक मंदीच्या काळात ढासळत्या अर्थव्यवस्थेला ते योग्य ठरेल, असा टोला कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृ्थ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता.१५) पिंपरी-चिंचवडमध्ये लगावला. रोजगार व अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर राज्य सरकार फेल ठरले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ओला व उबेरमुळे आर्थिक मंदी आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विधान हे जबाबदार व्यक्तीचे बेजबाबदार वक्तव्य असल्याचे ते म्हणाले.
 
मंदीचे वातावरण विदारक असून दुसरीकडे त्यावरील सीतारामन यांच्या उपाययोजना थातूरमातूर आहेत, असे चव्हाण म्हणाले. बॅंकांचे विलीनीकरण हा त्यावरील उपाय नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार मंदीवर काय उपाययोजना करणार आहे,अशी विचारणा त्यांनी केली. नोटाबंदी व जीएसटीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला.नरेंद्र मोदी २०१४ ला सत्तेत आल्यानंतर घोटाळ्याची रक्कम १० हजार कोटी रुपयांहून ७३ हजार कोटी रुपयांवर गेल्याचा आरोप त्यांनी रिझर्व बॅंकेच्या अहवालाच्या आधारे केला.

दक्षिण कराडच्या  (जि.सातारा) पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांच्या मेळाव्यानंतर चव्हाण पिंपरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाचे शहराध्यक्ष सचिन साठे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे, प्रदेश अनूसूचित जाती कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष, गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट ,प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून तीस लाख रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.१४) महाजनादेश यात्रेदरम्यान पुण्यात केला होता. त्याबाबत चव्हाण यांनी सरकारचीच आकडेवारी व अहवाल सादर करत मुख्यमंत्र्यांचे दावे खोटे असल्याचे सांगितले.  पुणे औद्योगिक पट्यात फक्त वीस हजार ८६३ रोजगाररनिर्मिती व ४४५ कोटींची गुंतवणूक गेल्या चार वर्षात झाल्याची माहिती एमआय़डीसीनेच आरटीआयमध्ये दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुणे एमआयडीसीत सर्वाधिक गुंतवणूक व सर्वाधिक रोजगार दिल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा ही निवडणुकीच्या तोंडावर केलेली दिशाभूल असल्याचे त्यांनी सांगितले. 

किती उद्योग बंद झाले व रोजगार गेले त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली. अनेकदा मागूनही जिल्हावार किती गुंतवणूक ल रोजगारनिर्मिती झाली,त्याची माहिती सरकार देत नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात साडेतीन लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून गुंतवणुकीत राज्य आठव्या नंबरवरून १३ व्या क्रमाकांवर गेल्याची राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील माहिती देत त्यांनी भाजप सरकार व मुख्यमंत्र्यांच्या दाव्यात फोलपणा असल्याचा आरोप केला. देशात ऑटो इंडस्ट्रीतील तीन लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून दहा लाख आणखी जाण्याची भीती त्यांनी वर्तविली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख