Prime minister Modi had given me an offer to work togather : Sharad Pawar | Sarkarnama

मोदी मला म्हणाले होते, आपण एकत्र काम करू या : शरद पवार 

सरकारनामा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

त्यांनी राष्ट्रपती पदाची ऑफर दिलेली नव्हती आणि माझ्याही मनात तसे नव्हते . -शरद पवार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मला म्हणाले होते , आपण एकत्र येऊन काम केले तर त्यांना  बरे वाटेल. सुप्रिया पार्लमेंटमध्ये चांगले काम करते तिलाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्याबाबतही ते बोलले होते , असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला .

 भाजपने आपल्याला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती का या प्रश्नाचे उत्तर देताना श्री पवार म्हणाले, त्यांनी राष्ट्रपती पदाची ऑफर दिलेली नव्हती आणि माझ्याही मनात तसे नव्हते . मात्र आपण एकत्र येऊन काम केले तर त्यांना  बरे वाटेल. सुप्रिया पार्लमेंटमध्ये चांगले काम करते तिलाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्याबाबतही ते बोलले होते. पण माझ्या मनात त्याबाबत तयारी नव्हती . 

शरद पवार  नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत  बोलताना सांगितले ,  महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.  विदर्भातही नुकसान खूपच मोठे होते.  त्यामुळे  विदर्भातील नुकसानीची पाहणी दौरा केल्यानंतर मी  नागपूर येथे पत्रकारांना बोलूनही दाखवले होते ,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी अशी माझी भूमिका आहे.  मी यासंदर्भात पंतप्रधान शब्द बोलणार आहे , असे म्हणालो होतो. 

त्यानुसार पंतप्रधानांची भेटीची वेळ मागितली आणि आमची भेट झाली या भेटीचा तपशील सांगताना शरद पवार म्हणाले , अतिवृष्टी परिस्थितीबाबत  भेटीत  आमची चर्चा बोलणे   पूर्ण झाल्यानंतर मी जाण्यासाठी उठलो . त्यावर पंतप्रधान मला म्हणाले ,'थोडं थांबा . आपण एकत्र येऊन काम केले तर मला बरं वाटेल.' 

मी त्यांना असं म्हणालो , 'आपले वैयक्तिक संबंध चांगले आहेत.  पुढेही  चांगले राहतील . परंतु राजकीय दृष्ट्या एकत्र येणार आणि एकत्र काम करणे मला शक्य होणार नाही .'

 
पंतप्रधान मला म्हणाले की आपली मतभिन्नता कुठे आहे ? शेती, उद्योग अनेक विषयांवर आपली मतं ही एक सारखी आहे , त्यामुळे आपण एकत्र काम करावे असे मला वाटते . 

 तर मी त्यांना म्हणालो, 'राजकीय विषयात  विरोधासाठी विरोध करणार नाही . जेथे मला योग्य  वाटेल तेथे मी त्यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करील . परंतु मी एक लहान का होईना पक्ष चालवत आहे.  विशिष्ठ  विचारांचे माझे कार्यकर्ते आहेत.  त्यांची एक दिशा आहे . त्या कार्यकर्त्यांच्या दिशेबाहेर मी जाऊ शकत नाही आणि कृपया मला हे शक्य नाही,' असे मी त्यांना विनम्रपणे सांगितले असेही श्री पवार म्हणाले. 

यापूर्वी त्यांनी आपल्याला या संदर्भात इंडिकेशन दिले होते का  याविषयी  विचारले असता शरद पवार म्हणाले ,  पार्लमेंटमध्ये भाजपचे वरिष्ठ सहकारी  खूपदा बोलायचे की एकत्र काम केले पाहिजे.  परंतु  ज्या रस्त्याला आपल्याला जायचे नाही त्या रस्त्याकडे कशाला वळायचे असा मी विचार केला .  मला समाधान आहे की मी माझी भूमिका स्पष्ट करून त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी संभ्रम राहू दिला नाही . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख