Pressure for Not Releasing Maratha Activists from Nashik | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना नाशिक सोडण्यास मनाईसाठी दबाव  

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

मराठा क्रांती मोर्चातर्फे विधानभवनाला घेराव करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी शहरात पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबध्द केले होते. आज त्यांना जिल्हा सोडण्यास मनाई करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चातर्फे विधानभवनाला घेराव करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी शहरात पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबध्द केले होते. आज त्यांना जिल्हा सोडण्यास मनाई करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे राज्य समन्वयक हंसराज वडघुले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संसदेला घेराव घालण्याच्या आंदोलनासाठी दिल्लीकडे निघाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सकल मराठी समाजाच्या नेत्यांची ताकद विभागली असे चित्र आहे. 

शहरातील नाशिक रोड, उपनगर, आडगाव, गंगापुर या चार पोलिस ठाण्यांत सकल मराठा समाजाच्या 92 पदाधिकाऱ्यांना स्थानबध्द करण्यात आले होते. शहरात मुंबई- आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत होती. मुंबईला निघालेल्या अनेकांना पोलिसांनी माघारी पाठवले. त्यामुळे सोमवारी सकाळी गोल्फ क्‍लब मैदानातुन निघणारी वाहने मुंबईला जाऊ शकली नाही. कार्यकर्त्यांनी जमेल त्या मार्गाने मुंबईला जावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे तुषार जगताप यांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते दुपारी मुंबईला पोहोचले. त्यांनी आंदोलनात भाग घेतला. मात्र काल स्थानबध्द केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हा सोडू नये असा पोलिसांकडून दबाव आणला जात आहे. वरिष्ठ स्तरावरुन सुचना आल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जाते. पोलिस प्रशासनाने मात्र असा काहीही दबाव नाही असे स्पष्ट केले. 

संघटनेचे राज्य समन्वयक हंसराज वडघुले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. संघटनेच्या आदेशानुसार देशातील 203 संघटना स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व अन्य मागण्यांसाठी येत्या गुरुवारी (ता.29) संसदेला घेराव घालणार आहे. त्यासाठी ते आज रेल्वेने दिल्लीला रवाना झाले आहेत. आपल्या सोबत शेकडो कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला. एकीकडे जिल्हा न सोडण्याची नोटीस व दिल्लीची घेराव यामुळे मराठा क्रांती मोर्चाची ताकद विभागली गेल्याचे चित्र आहे. 

नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे पुर्वनियोजित आंदोलन होत आहे. देशातील 203 शेतकरी संघटनांतर्फे संसदेला घेराव घालण्यात येईल. त्यात सहभागी होण्यासाठी आम्ही जात आहोत. ती देखील समाजाची प्रमुख मागणी आहे. - हंसराज वडघुले, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी युवा शेतकरी संघटना 

पोलिसांनी 92 जणांवर कारवाई केली. त्यांना सोडून देण्यात आले. मात्र माझ्यावर गुन्हा दाखल केल्याने सोडलेले नाही. मी जामीन घेऊन सुटका करावी अशी पोलिसांची सुचना आहे. त्याला मी नकार देऊन आंदोलन सुरु ठेवणार आहे - करण गायकर, मराठा क्रांती मोर्चा. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख