Press room in PCMC removed by admin | Sarkarnama

पालिकेतील पत्रकारकक्ष पारदर्शी सत्ताधाऱ्यांनी हटविलाच

उत्तम कुटे
सोमवार, 10 एप्रिल 2017

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 31 वर्षे जुना व पत्रकार आणि नागरिक अशा दोघांच्याही अत्यंत सोईचा असा येथील महापालिका मुख्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्ष हटविण्याचे काम रविवारी सुट्टीची संधी साधून पालिका प्रशासनाने सुरू केले. पालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या "पारदर्शक' कारभारात अडथळा ठरत असल्याने तो हटविला गेल्याचे समजले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 31 वर्षे जुना व पत्रकार आणि नागरिक अशा दोघांच्याही अत्यंत सोईचा असा येथील महापालिका मुख्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्ष हटविण्याचे काम रविवारी सुट्टीची संधी साधून पालिका प्रशासनाने सुरू केले. पालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या "पारदर्शक' कारभारात अडथळा ठरत असल्याने तो हटविला गेल्याचे समजले.

मात्र, स्थायी समितीतील कर्मचाऱ्यांना पुरेशी जागा करण्याकरिता तो पाडण्यात आला असून तो आता स्थायी समिती दालनाला जोडण्यात येणार असल्याचे पालिकेच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता (मुख्यालय) सतीश इंगळे यांनी सांगितले. हा कक्ष हटविण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या असल्याचे वृत्त  "सरकारनामा'ने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले.

हा कक्ष हटविण्यामागील कारण विचारले असता तो हटविण्याची मागणी स्थायी समिती पदाधिकाऱ्यांनी केली होती, असे श्री इंगळे यांनी सांगितले. हटविण्यात आलेल्या कक्षातील पत्रकारांना याच मजल्यावरील भा.वि.कांबळे कक्षात जागा दिली जाणार असून तेथील इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींची सोय इतरत्र केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीसह विविध विषय समित्यांची कार्यालये असलेल्या या मजल्यावरील हा कक्ष पत्रकार व त्यांना भेटायला येणाऱ्यांच्याही दृष्टीने सोईचा होता. गेली 31 वर्षे त्याची कसलीही अडचण पालिकेतील सत्ताधाऱ्यांना झाली नव्हती. एवढेच नाही, तर पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील युतीचे सरकार व त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन संमत केल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी पत्रकार संघटनेने मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा व इतर पालिका पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला होता. यावेळी हा कक्ष म्हणून तो हटवू नये, अशी मागणीही त्यांनी केली होती. या आशयाचे निवेदन त्यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनाही दिले होते. मात्र, ते धुडकावून पालिकेत पाशवी बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपने आपल्या पारदर्शक कारभाराचा पहिला हातोडा जागल्याची भूमिका निभावणाऱ्या या "वॉचडॉग'वरच चालविला आहे. त्यातून त्यांच्या भावी कारभाराची दिशा स्पष्ट होत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख