महिना झाला तरी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हाधिकारी पदाचा चार्ज घेतला नाही   - Prerna Deshbhratar did not take charge of Beed Collector | Politics Marathi News - Sarkarnama

महिना झाला तरी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हाधिकारी पदाचा चार्ज घेतला नाही  

सरकारनामा
शनिवार, 4 जानेवारी 2020

जिल्ह्यात बीड आणि अंबाजोगाई येथे अपर जिल्हाधिकारी पदे आणि कार्यालये आहेत; मात्र ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे दोन्ही पदांवर प्रभारीच अधिकारी आहेत. यासह उपजिल्हाधिकाऱ्यांची पदेही रिक्त असल्याने या पदांचा पदभारही प्रभारींकडेच आहे.

बीड : सर्व यंत्रणांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या आणि अनेक अधिकार असलेल्या येथील महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. रिक्त पदांमुळे महसूलमध्ये आता 'प्रभारी राज' आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांवरही प्रभारीच विराजमान आहेत.

 गट 'अ' व 'ब'ची 19 पदे रिक्त असून जिल्हाधिकाऱ्यांसह तब्बल 212 पदे रिक्त आहेत. महिन्यापूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी पदावर बदली झालेल्या प्रेरणा देशभ्रतार अद्यापही रुजू झालेल्या नाहीत. या पदाचा भार तरी किमान भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांकडे आहे.

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडेय यांची चार डिसेंबरला औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदावर बदली झाली. त्यांच्या जागी 'यशदा'च्या प्रमुख प्रेरणा देशभ्रतार यांची शासनाने नेमणूक केली. श्रीमती देशभ्रतार यांची बदली होऊन शनिवारी (ता. चार) एक महिना उलटला होता. तरीही त्या अद्याप रुजू झालेल्या नाहीत. 

त्यांचा पदभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या फायलींची पेंडन्सी जास्त नसली तरी इतर गट 'अ' व 'ब'ची तब्बल 19 पदे रिक्त आहेत. त्यामुळे खालूनच वर फाईल सरकायला तयार नाही. त्याचा परिणाम जिल्ह्यातील इतर यंत्रणा आणि परिणामी विकासावर होत आहे.

पहिल्या महिला जिल्हाधिकारी आल्याच नाहीत
बीडला आतापर्यंत जिल्हाधिकारी म्हणून खासदार असलेले श्रीनिवास पाटील, अरविंदकुमार, पीयूष सिंह, सुनील केंद्रेकर, आनंद लिमये असे शिस्तीचे अधिकारी येऊन गेले. अलीकडच्या काळात या यादीत एम. देवेंद्र सिंह आणि आस्तिककुमार पांडे यांनीही शिस्त व कारवायांतून जनसामान्यांत छाप पाडली. दरम्यान, प्रेरणा देशभ्रतार या जिल्ह्यात येणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत. वरील यादीमुळे त्यांच्याकडूनही वाढत्या अपेक्षा आहेत. मात्र महिना उलटला तरी अद्याप त्या रुजू झालेल्या नाहीत.

दोन्ही अपर प्रभारीच; 212 पदे रिक्त
जिल्ह्यात बीड आणि अंबाजोगाई येथे अपर जिल्हाधिकारी पदे आणि कार्यालये आहेत; मात्र ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे दोन्ही पदांवर प्रभारीच अधिकारी आहेत. यासह उपजिल्हाधिकाऱ्यांची पदेही रिक्त असल्याने या पदांचा पदभारही प्रभारींकडेच आहे. नायब तहसीलदारांची तब्बल 14 पदे रिक्त आहेत, तसेच अव्वल कारकून (20), मंडळ अधिकारी (नऊ), लिपिक (59), तलाठी (67), लघुटंकलेखक (दोन), वाहनचालक (सात), लघुलेखक (चार) आणि शिपायांची 31 पदे रिक्त आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख