पुणेकरांचे पाचशे कोटी वाचविणाऱ्या प्रेरणा देशभ्रतार सत्ताधिकाऱ्यांना नकोशा  - prerana deshbratar who saved Rs 500 crore of punekars | Politics Marathi News - Sarkarnama

पुणेकरांचे पाचशे कोटी वाचविणाऱ्या प्रेरणा देशभ्रतार सत्ताधिकाऱ्यांना नकोशा 

उमेश घोंगडे
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे : महापालिकेच्या समान पाणी वाटप योजनेत पुणेकरांचे किमान पाचशे कोटी रूपये वाचविणाऱ्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. कामकाजातील शिस्त व अंतर्गत बदल्यांना नियम लावल्याने भाजपच्या सत्ताधाऱ्यांची अडचण झाली.

पुणे : महापालिकेच्या समान पाणी वाटप योजनेत पुणेकरांचे किमान पाचशे कोटी रूपये वाचविणाऱ्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. कामकाजातील शिस्त व अंतर्गत बदल्यांना नियम लावल्याने भाजपच्या सत्ताधाऱ्यांची अडचण झाली.

गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या बदलीसाठी किमान 25 नगरसेवकांनी पत्र लिहून बदलीची मागणी केली. विशेष म्हणजे पारदर्शक कारभाराची टिमकी मिरवणाऱ्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश होता. महापालिकेतील एका प्रमुख पदाधिकाऱ्याने देशभ्रतार यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

देशभ्रतार यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून सुमारे 22 महिने पुण्यात काम पाहिले. या काळात त्यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याबरोबरच महापालिकेच्या विकास कामांचे नियोजन केले. या साऱ्यातच शिस्त केंद्रस्थानी होती. समान पाणी वाटप योजनेत पूर्व गणक पत्र (इस्टिमेट कमिटी) तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद देशभ्रतार यांच्याकडे होते. पाणी वाटप योजनेत केबल डक्‍टच्या कामाला विरोध करीत यात सुमारे तीनशे कोटी रूपये वाचविले.

 त्यांनी केलेल्या कडक नियमांमुळे पाणी वाटप योजनेसाठी आलेल्या निविदेतही सुमारे तीनशे कोटी रूपयांची बचत झाली. या साऱ्याच गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीच्या ठरल्याने देशभ्रतार यांची बदली करण्यासाठी गेले काही दिवस प्रयत्न सुरू होते. विशेष म्हणचे मुंढे आणि देशभ्रतार यांची बदली होणार असे हे पदाधिकारी बदलीच्या आदल्या दिवशीच सांगत होते.

महापालिकेत महापालिकेतील सुरक्षा रक्षकांच्या बदल्यांवरून सर्वसाधारण सभेतही रणकंदन झाले होते. त्यावेळीदेखील तुमच्या बदलीची मागणी आम्हाला करावी लागेल, अशी धमकीच नगरसेवकांनी देशभ्रतार यांनी दिली होती. महिन्याभरात त्याची प्रचिती पुणेकरांना आली. 

भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासन देण्याची ग्वाही देऊन दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत आलेल्या भाजपने चांगले काम करणाऱ्या आधिकाऱ्यांचा कामच करू द्यायचे नाही, असा जणू चंगच बांधला आहे. मुंढे आणि देशभ्रातर यांच्या बदलीने भाजपने सिद्धच करून दाखवले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख