Madhavrao Godbole, Sharad Pawar
Madhavrao Godbole, Sharad Pawarsarkarnama

शरद पवार आणि माधवराव गोडबोले वादाचा उडालेला 'फ्यूज'

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधवराव गोडबोले (Madhavrao Godbole) यांचे पुण्यात आज ता. (२५) निधन झाले.

पुणे : माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले (Madhavrao Godbole) यांचे पुण्यात आज ता. (२५) निधन झाले. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात माधव गोडबोले हे केंद्रीय गृहसचिव होते. राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी बाबरी मशिदीचे जतन करणे आवश्यक आहे, असी त्यांची धारणा होती. यासंदर्भात गोडबोले यांनी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र, बाबरी मशिदीचे पतन रोखता आले नाही यामुळे व्यथित होऊन त्यांनी गृहसचिव पदाचा राजीनामा दिला होता.

त्याच बरोबर गोडबोले केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आणि नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले होते. महाराष्ट्रचे मुख्य वित्तसचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. बाबरी मशिदी पाडल्याच्या वेळी नरसिंह राव झोपले होते, अरा आरोप केला जात होता. तो आरोप गृहसचिव असलेल्या गोडबोले यांनी खोडून काढला होता. नरसिंहराव सतत आमच्या संपर्कात होते आणि प्रत्येक मिनिटाची माहिती घेत होते, असे गोडबोले यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटले होते.

सध्या जशी भारनियमनाची चर्चा सुरू आहे तशीच ती 2003 मध्येही सुरू होती. भारनियमनात महाराष्ट्र होरपळून निघत होता. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका दैनिकाला मुलाखत दिली होती. गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने महाराष्ट्रात नव्या ऊर्जा प्रकल्पांची गरज नाही, अशी शिफारस काही वर्षांपूर्वी केली होती. हा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आणि नवीन ऊर्जा प्रकल्प उभारले नाही. त्यामुळे राज्यात विजेच टंचाई निर्माण झाली, असे पवार म्हणणे होते. यावरुन वाद निर्माण झाला होता.

या मुलाखतीनंतर गोडबोले यांनी पवार यांचे आरोप फेटाळून लावणारी पत्रकार परिषद पुण्यातील पत्रकार संघात घेतली होती. या परिषदेत गोडबोले यांनी पवारांचे आरोप फेटाळले होते. आपली शिफारस ही एनराॅन प्रकल्पासंदर्भात होती. त्यामुळे नवीन प्रकल्प उभारण्यास माझ्या अहवालामुळे अडचण नव्हती, अशी बाजू त्यांनी मांडली होती. त्यांनी जाता जाता एक विधान केले. पवार यांनी अहवाल वाचलेलाच नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

दोन्ही बाजूंनी हा वाद आठवडाभर चालला. त्यानंतर पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. परिषदेचा रोख राज्यातील भारनियमनावरच होता. पहिले एक-दोन प्रश्न झाल्यानंतरच आपल्या समितीचा अहवाल वाचलाच नसल्याचा गोडबोले यांचा आरोप आहे, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्याविषयी शेवटी बोलू म्हणत पवारांनी इतर प्रश्न घेतले. पत्रकार परिषद संपायला आली. शेवटी तो प्रश्न पुन्हा विचारण्यात आला. पवारांनी गोडबोले खरेच असे म्हणालेत का, अशी विचारणा केली. पत्रकारांनी हो म्हणून सांगितले. त्यानंतरच पवार यांनी दिलेले उत्तर आक्रमक होते. लिहिण्या-वाचण्यावर अजून आपलाच मक्ता आहे, या समजूतीतून ते अद्याप बाहेर आलेले दिसत नाहीत, असे म्हणत पवारांनी वेगळ्याच दिशेने हा वाद नेला. पवारांचा हा रोख आता सर्वांच्याच लक्षात आला. त्यांनी थेट 'ब्राह्मण्यवादा'ला हात घातला होता. पवारांच्या या आरोपानंतर गोडबोले व्यतिथ झाले. या विषयावर आपण आता प्रत्युत्तर देणार नसल्याचे सांगत आपल्या बाजूने वाद संपल्याचे त्यांनी पत्रक काढून जाहीर केले होते.

राज्यात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) अशा दोन गटांत राजकीय संघर्ष होताच. यात गोडबोले हे शंकरराव चव्हाण यांचे लाडके होते. त्यामुळे चव्हाण यांनी नेहमीच त्यांना महत्वाची जबाबदारी दिली. चव्हाण हे राज्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर गोडबोलेंना अर्थ सचिव केले. गोडबोलेंनी झिरो बजेट राबवत अनेक जुन्या योजना, नोकरभरती बंद केली. त्यावरून बराच वाद झाला. चव्हाण हे केंद्रात गेले आणि राज्यात पवार हे मुख्यमंत्री झाले. पवारांनी झिरो बजेट बंद करून टाकले. नरसिंहराव हे पंतप्रधान झाल्यानंतर शंकरराव हे केद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर माधवराव केंद्रीय गृहसचिव झाले. बाबरी मशीद पतनाच्या काळात त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी होती. त्यांच्या आत्मचरित्रामुळेच त्या काळात नरसिंहराव सरकारचे वर्तन कसे होते, यावर प्रकाश पडला. यात चव्हाण यांची भूमिका काय होती, हे त्यांनी मात्र स्पष्टपणे सांगितले नव्हते.

शरद पवार यांनी गोडबोले यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, माजी केंद्रीय गृह सचिव डॉ. माधवराव गोडबोले यांच्या निधनाने एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले निष्णात अधिकारी व एक उत्तम साहित्यिक आपण गमावले आहेत. भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्य पद्धतीत आहे हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून माधव गोडबोले यांनी कार्य केले. देशासाठी सनदी अधिकारी म्हणून त्यांनी अतुलनीय योगदान दिले. राज्यात आणि केंद्रात विविध पदांवर आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवला. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी विपुल लेखनही केले. आपले विचार स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मांडण्याचे धाडस दाखविले. भारताची धर्मनिरपेक्षता धोक्याच्या वळणावर" आणि "भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा" ही त्यांची दोन पुस्तके आजच्या वर्तमान परिस्थितीत दिशादर्शक ठरावीत अशी आहेत. व्यवस्थेला शरण न जाता स्वतःचे विचार ठामपणे मांडणारे डॉ. माधवराव गोडबोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com