modi and gandhi family

modi and gandhi family

Sarkarnama

खेलरत्न पुरस्काराचं काय विशेष? मोदींना अजून तर खूप काही बदलायचं आणि तोडायचंय!

पंतप्रधान मोदी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेत म्हणालेहोते,अभी तो बहोत कुछ तोडना और बहोत कुछ बदलना बाकी है...

लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवत नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 'सबका साथ, सबका विकास'चं स्वप्न भारतीयांना दाखवत त्यांनी कामाला धडाक्यात सुरूवात केली. ही सुरूवात करताना त्यांनी 'न्यू इंडिया'चा गजर सुरू केला. त्याची चुणूक ते पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यसभेत गेले तेव्हाच आली होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच राष्ट्रपती भाषणाच्या दरम्यान सेंट्रल हॉलमध्ये वारंवार बाकांचा गजर होत होता. त्यात पंतप्रधान मोदीही मागे नव्हते. त्यानंतर ते राज्यसभेत आले तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद त्यांना विनोदाने म्हणाले होते, की  मोदीजी, तुम्ही इतक्या जोराने बाक वाजवत होता की वाटले तो बाक आता तुटणारच... त्यावर मोदी उत्तरले होते, अभी तो बहोत कुछ तोडना और बहोत कुछ बदलना बाकी है...

स्पष्ट वैचारिक अजेंडा!

मोदी सरकारचा वैचारिक अजेंडा अतिशय सुस्पष्ट आहे. त्यात ते मागे येत नाहीत. या वैचारिक अजेंड्यात नेहरू, इंदिरा आणि राजीव गांधी या तीन नावांना विरोध असणे स्वाभाविक आहे. या तीन नावांमुळे जे राजकीय नॅरेटिव्ह तयार होते, ते भाजपला पुसून टाकायचे आहे. इतिहासातील धड्यांपासून ते रस्त्याच्या नावांपर्यंत बदल करण्याचा भाजपचा हेतू लपून राहिलेले नाही. मोदी याच मार्गावरून गेली सात वर्षे पावले टाकत राहिले. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणुकीतील प्रचार असो तेथे मोदी हे गांधी घराण्याच्या अपयशाविषयीचा मुद्दा मांडत असतात. देशाच्या अधोगतीला या नेहरूंच्या धोरणांना जबाबदार धरत असतात. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव मोदी कसे मंजूर करतील? त्यामुळेच भारत हा टोकियो आॅलिंपिकमध्ये एकीकडे पदके मिळवत असताना दुसरीकडे मोदी हे नावबदलाची घोषणा करत होते. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे  नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यासाठीचा मुहूर्तदेखील त्यांनी योग्य शोधून काढला होता.

पंतप्रधान मोदींनी दिलेल्या या उत्तरात त्यांना नेमकं काय सांगायचं होतं, हे मागील सात वर्षात अनेकदा दिसून आलं आहे. शुक्रवारी त्यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले. आता हा पुरस्कार राजीव गांधी यांच्या नावाऐवजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने ओळखला जाईल. या नामांतरानंतर आझाद यांना मोदींच्या 'अभी तो बहोत कुछ तोडना और बहोत कुछ बदलना बाकी है' या उत्तराची आठवण पुन्हा एकदा झाली असेल. 

संघ आणि भाजप नेत्यांच्या नावांना पसंती

साहजिकच राजीव गांधी यांचं नाव बदलल्यानंतर काँग्रेसकडून जोरदार टीका सुरू करण्यात आली आहे. पण गेल्या सात वर्षांत मोदी सराकरनं गांधी-नेहरू कुटूंबातील व्यक्तींच्या नावाने सुरू असलेल्या योजना व इमारतींच्या नावांबद्दल आपल्या मनातील याबद्दलचा तीव्र रोष सतत दाखवून दिला आहे. गांधी-नेहरू घराण्यातील व्यक्तींची नावं लागलेली शहरे, रेल्वे स्थानके, संस्था, बंदरे आदी अनेकांचा नामबदल मोदींनी केला आहे. हे इथेच थांबणार नाही हे मोदींनी शुक्रवारी दाखवून दिलंच आहे. पण ही नावं बदलत असताना त्यांनी भाजप किंवा संघाशी संबंधितांच्या नावांनाही पसंती दिल्याचे दिसते. 

जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी संरक्षणमंत्री अरूण जेटली व मनोहर पर्रीकर, माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज या दिवंगतांची नावे सरकारने अनेक संस्थांना दिल्याचे वास्तव कुणीच नाकारू शकणार नाही. उपाध्याय यांच्या नावाने योजना, रेल्वे स्थानक व अनेक योजनांचे नामकरण करण्यात आले आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी पर्यावरण भवनाला फक्त पर्यावरण भवन संबोधण्यास सुरूवात झाली. मोदींच्या गुजरातमधील अहमदाबादेतील सरदार पटेल यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱया क्रीडागाराला खुद्द मोदींचेच नाव देण्यात आले. त्यावरून बराच वाद झाला. पण त्यावर भाजप नेत्यांनी युक्तिवाद केला, की दिवंगत इंदिरा गांधी यांनीही आपल्या हयातीत अनेक संस्थांना-इमारतींना आपल्या नाव दिलं होतं. भाजप नेत्यांकडून प्रामुख्याने दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमचे उदाहरण दिले जाते.

कमला, फिरोज आणि संजय गांधी या नावांना वगळले...

मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या किमान 25 योजनांची केवळ नावं बदलून मोदी सरकार त्याच पुढे आणत असल्याचं ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सांगितलं होतं. मात्र राजकीय जाणकार यातील यात सूक्ष्म फरक असल्याचं सांगतात. ज्येष्ट विश्लेषक सईद अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार, मोदी हे गांधी-नेहरू घराण्याबाबत सरसकट द्वेष दाखवत नाही. नामबदलातून त्यांनी कमला नेहरू, फिरोज गांधी व संजय गांधी यांच्या नावाने असलेल्या योजना, इमारती आदींना सूचकपणे वगळल्याचे दिसते. 

सन 2015 मध्ये तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी माध्यमांशी बोलताना तब्बल 600 ते 650 सरकारी योजनांना नेहरू- गांधी घराण्यातील व्यक्तींची नावं असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यात किमान बारा केंद्रीय व 52 राज्य सरकारांच्या योजना, 98 शैक्षणिक संस्था, 28 क्रीडा स्पर्धा व पुरस्कार, एकोणिस स्टेडियम, पाच ते आठ आंतरराष्ट्रीय विमानतळे व बंदरे, 51 पुरस्कार, पंधरा फेलोशीप, पंधरा राष्ट्रीय अभयारण्ये व उद्याने, 39 राष्ट्रीय रूग्णालये व आरोग्य संस्था, वैद्यकीय संशोधन संस्था, 74 रस्ते-महामार्ग आदींचा समावेश असल्याची माहिती नायडू यांनी दिली होती. 

मागील सात वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं अनेक योजना व ठिकाणांची नावं बदलली आहेत. पण ही मोहिम इथेच थांबणार नसल्याचं त्यांनी शुक्रवारी दाखवून दिलं आहे. दिल्लीतील नामांकित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलण्याचाही प्रस्ताव आहे. या विद्यापीठाला सुभाष चंद्र बोस यांचे तर दिल्ली विद्यापीठाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यासह इतर अनेक प्रस्ताव पंतप्रधानांच्या विचाराधीन आहेत. त्यामुळं पुढील काळात असे नामबदल होत राहिल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको.  

मोदींच्या मागील सात वर्षांच्या काळात झालेली नामांतरं :
आधीचे नाव                    सध्याचे नाव
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना        पंतप्रधान मातृ वंदना योजना
इंदिरा आवास योजना            पंतप्रधान आवास योजना
राजीव आवास योजना            सरदार पटेल राष्ट्रीय शहरी आवास मिशन
राजीव ग्रामीण विद्युतीकरण योजना        दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण योजना    पंतप्रधान आवास योजना (शहरी) कायाकल्प (अटल मिशन) 
इन्स्टीट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अॅंड अॅनालिसिस    मनोहर पर्रिकर  इन्स्टीट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अॅंड अॅनालिसिस
मोटेरा स्टेडियम                नरेंद्र मोदी स्टेडियम
विदेश सेवा संस्था भवन            सुषमा स्वराज भवन
प्रवासी भारतीय केंद्र                सुषमा स्वराज भवन
फिरोजशहा कोटला मैदान            अरूण जेटली स्टेडियम
कांडला बंदर                दीनदयाळ बंदर
मुगलसराय जंक्शन                दीनदयाळ उपाध्याय जंक्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com