danave-vaishanv
danave-vaishanvSarkarnama

IIT ची पदवी, IAS झालेले वैष्णव अन् BA पास दानवे यांचं कसं जुळणार?

उच्चविद्याविभूषित व्यक्ती मंत्री म्हणून येणे योग्य असले तरी याचा अर्थ लोकशाहीत शिक्षण आणि शहाणपण या दोन्हीलाही महत्व आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार बुधवारी झाला. या विस्तारामध्ये राज्यसभेचे खासदार असलेले अश्विनी वैष्णव यांना महत्वाचं रेल्वे खातं देण्यात आलं आहे. त्यांच्या जोडीला राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण वैष्णव यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित नेत्यासोबत कला शाखेची पदवी (बी. ए.) घेतलेल्या दानवे यांचं कसं जुळणार, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

देशातील रेल्वे सध्या कात टाकू पाहत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेचं रुपडं बदललं जात आहे. बुलेट ट्रेन, हायपरलूपचे वारे वाहत असताना वैष्णव यांच्या रुपाने रेल्वेला त्याच तोडीचे कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. वैष्णव यांचा बायोडाटा सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यांनी घेतलेल्या पदव्या, उच्च पदांवर केलेले काम याची माहिती त्यामध्ये आहे. वैष्णव यांच्या रूपाने रेल्वे खात्याला उच्चविद्याविभूषित मंत्री मिळाले आहेत. त्यांनी इलेक्ट्रानिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर कानपूर आयआयटीतून पदव्यूत्तर पदवी तर अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेतले आहे. वैष्णव यांचे कौतुक होत आहेच पण त्यांच्या समावेशाबद्दल मोदींचेही आभार मानले जात आहेत. 

वैष्णव हे 1994 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते. या परीक्षेत देशपातळीवरील  गुणवत्ता यादीत त्यांचा 27 वा क्रमांक होता. त्यानंतर त्यांनी ओडिशातील बालासोर आणि कटक जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उप सचिव म्हणून काम केले. 2006 मध्ये ते मोरमुगाओ पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर दोन वर्षे एमबीए पदवीसाठी अमेरिकेला गेले.

दडपून जावे अशी वैष्णव यांची कारकिर्द!

अश्विनी वैष्णव (खासदार, राज्यसभा)
- इलेक्ट्रानिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी (सुवर्ण पदक)
- एम. टेक., आयआयटी कानपूर
- एमबीए, वॅार्टन (अमेरिका)
- आयएएस (गुणवत्ता यादीत 27 वा क्रमांक)
- माजी जिल्हाधिकारी, बालासोर
- उपाध्यक्ष, सिमेन्स
- एमडी, जीई ट्रान्सपोर्टेशन


भारतात परतल्यानंतर जीई ट्रान्सपोर्टेशन कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम सुरू केले. 2012 पर्यंत त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम केले. मग त्यांनी गुजरातमध्ये दोन कंपन्या सुरू केल्या. यादरम्यान त्यांचा राजकारणाशीही संबंध आला. त्यातूनच 2019 मध्ये त्यांना भाजपाकडून राज्यसभेवर संधी देण्यात आली. मोदींनी इतक्या विद्वान माणसाकडे माहिती तंत्रज्ञान हे देखील महत्वाचे खाते दिले आहे.

वैष्णव यांच्या या निवडीचे एकीकडे कौतुक होत असताना राजकारणात त्यांच्यापेक्षा अधिक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले रावसाहेब दानवे यांना त्यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. दानवे यांच्याकडे रेल्वेचे राज्यमंत्रीपद आले आहे. एकीकडे वैष्णव हे उच्चविद्याविभूषित असताना दानवे हे कला शाखेचे पदवीधर आहेत. त्यामुळं त्यांचा ताळमेळ कसा बसणार, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.

दानवेही अनुभवाने कमी नाहीत...

दानवे यांचे औपचारिक शिक्षण  बी.ए. पर्यंत झाले आहे. `बारा भोक्शाचा पाना` म्हणून दानवे यांचे वर्णन केले जाते. हा पाना जसा कोणत्याही यंत्रावर चालतो, तसेच कसलीही राजकीय परिस्थिती असली तरी त्यावर मात करण्याचे दानवे यांचे कौशल्य वादतीत आहेत. भाजपची `पणती` कुठेही तळपत नव्हती तेव्हापासून दानवे भाजपमध्ये कार्यरत आहेत. जनमाणसांची नाळ जुळलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे कॅबिनेट मंत्री हा टेक्नोक्रट असला तरी जनभावनांचा विचार करणारे दानवे हे काही कमी नाहीत, असे त्यांनी आतापर्यंत दाखलून दिले आहे. गावचा सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री हे झेप काही सोपी नाही. ती दानवे यांनी आव्हानात्मक परिस्थितीत करून दाखवली आहे. 

केंद्र सरकारच्या वाणिज्य, अर्थ खात्याची स्थायी समिती सदस्य, आयटी सल्लागार समिती, कृषी, पेट्रोलियम स्थायी समिती अशा विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम केलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. खासदारकीची त्यांची ही पाचवी टर्म आहे. दानवे यांच्याकडे माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॅानिक्स अन्य तत्सम क्षेत्रांतील थेट अनुभव नाही. पण त्यातील खाचखळगे त्यांना माहिती नाही, असेही नाही. अनुभव हा त्यांच्यासाठी मोठा गुरू आतापर्यंत ठरत आलेला आहे.

अनेक मंत्री हे कमी शिकलेले आणि अधिकारी हे उच्चविद्याभूषित असलेले अशी उदाहरणे आतापर्यंत अनेकदा दिसून आलेली आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे चौथी पास होते. पण इंजिनिअर, डाॅक्टरांच्या अनेक पिढ्या घडविणारे विनाअऩुदानित महाविद्यालयांचे धोरण त्यांनीच आणले होते, हे विसरून चालणार नाही. यशस्वी राजकारणी माणूस औपचारिक शिक्षणाने कमी असला तरी अनुभवाची आणि सामान्य माणसांच्या आकांक्षाची शिदोरी त्यांच्यासोबत असते. त्यामुळेच त्यांचे कमी असलेले शिक्षण कधी त्यांच्या मंत्रीपदाच्या आड येत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. दानवे यांना रेल्वे खाते मिळाल्यामुळे मराठवाड्याचा रेल्वेमार्गाचा अनुशेष भरून काढण्यास मोठी मदत होईल, अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे दानवे टेक्नोक्रॅट नसले तरी ते कामगिरीत कुठे कमी पडतील, याची शक्यता नाही. 

शिक्षणापेक्षा चिकाटी अन् इच्छाशक्ती महत्वाची

असाच सूर इतरांनीही लावला आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणाले की, लोकशाहीमध्ये शिक्षण आणि शहाणपण याला समान स्थान आहे. त्यामुळे शिक्षणावरून कोणत्याही मंत्री किंवा लोकप्रतिनिधीची तुलना इतरांशी करणं योग्य नाही. केवळ चौथी पास असूनही वसंतदादा पाटील मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरले. तसेच अनेक नेतेही खूप पुढे गेले आहेत. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्यासाठीही शैक्षणिक पात्रतेची अट नाही. मंत्री झाल्यानंतर त्यांच्या दिमतीला आयएएस किंवा आयपीएस अधिकारी असतात. निर्णय घेण्यासाठी सारासार विवेकबुध्दी महत्वाची असते. लोकप्रतिनिधींना जनतेचा पाठिंबा असतो.  त्यामुळं शिक्षणावरून ते यशस्वी होणार की नाही, हे आपण ठरवू शकत नाही. मंत्री म्हणून काम करताना शिक्षण नव्हे तर इच्छाशक्ती अन् चिकाटी महत्वाची असते. शिक्षणाचे फार उद्दातीकरण करू नये. असे झाले तर कमी शिक्षित नसलेल्यांना मागे रेटण्यासारखे होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in