devendra-Ajit Pawar.

devendra-Ajit Pawar.

Sarkarnama

पुण्याचा कारभारी कोण : अजित पवार की देवेंद्र फडणवीस?

दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली होती जुगलबंदी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 22 जुलै रोजीचा वाढदिवस महाराष्ट्रातील एकाच शहरात मोठ्या उत्साहाने साजरा झाला. ते शहर म्हणजे पुणे. नागपूरपेक्षा फडणविसांची सर्वाधिक होर्डिंग ही पुण्यात होती. पुण्याचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव भाजपने केला आणि भाजचपी रणनीती पुढे आली. भाजपच्या या रणनीतीला राष्ट्रवादीने पुण्याचे कारभारी म्हणून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव केला.

पुणे महापालिकेची निवडणूक ही प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस अशीच होणार आहे. म्हणजेच हा सामना अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडवणीस असा असणार आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसापासूनच पुण्यातील राजकीय वातावरण तापविण्यास या दोन्ही पक्षांनी सुरवात केली. कोथरूड, कसबा, पर्वती हे आधीच्या पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्ले मानले जातात. तर हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला या उपनगरांचा समावेश असलेल्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असल्याचे समजले जाते.

फडणवीस यांना पुण्याचे शिल्पकार म्हणून भाजपने महापालिका निवडणुकीत तेच पक्षाचा चेहरा असल्याचे जाहीर केले आहे. पुण्यातील अनेक निर्णय हे फडणवीस यांच्या सल्ल्यानेच सध्या होत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचा चेहरा अजित पवार हेच असणार आहेत. अजितदादांनी पुण्याचे कारभारी म्हणून 2007 ते 2017 पर्यंत सूत्रे सांभाळली होती. ती पुन्हा हातात येण्यासाठी राष्ट्रवादीनेही आतापासूनच जोर लावला आहे. राष्ट्रवादी ही निवडणूक काॅंग्रेस आणि शिवसेना यांना सोबत घेऊन लढण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांना येथे सोपी लढाई राहणार नाही. 

नवीन गावांची कौल कोणाला?

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतही राष्ट्रवादीची ताकद असल्याचे गृहितक आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने ही गावे महापालिकेत येत असली तरी राष्ट्रवादीला त्याचा फायदा 2022 च्या निवडणुकीत होईल, असे दिसत नाही. 

या 23 गावांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या गावांमध्ये जनसंपर्क ठेवण्यासाठी व संघटनात्मक बांधणीसाठी प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. त्याच प्रमाणे या गावांमधील आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या भेटीगाठींवर ही भर दिला जात आहे. अनेक इच्छुकांनी गावामध्ये महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अनेक इच्छुकांना महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचे वेध लागले आहेत. मात्र त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरण्यासाठी महत्वाचे कारण आहे ती वाॅर्डची संख्या.

नगरसेवकांच्या संख्येत फक्त दोनने भर

ही निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यामुळे महापालिकेत फक्त २ नगरसेवक वाढणार आहेत. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमातील २०१६ च्या सुधारित तरदुदीनुसार ३० लाख लोकसंख्येसाठी १६१ नगरसेवकांची संख्या निश्चीत केली आहे. त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक असे गणित आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या तीस लाख होती. त्यानुसार येथे 2017 मध्ये 162 नगरसेवक निश्चित झाले. त्यानंतर कालांतराने लोहगाव, फुरसुंगी आदी गावे नव्याने समाविष्ट झाली. या गावांची लोकसंख्या दोन लाख होती. त्यामुळे दोन नगरसेवकांची भर पुणे महापालिकेत पडली. त्यामुळे सध्या पुणे महापालिकेत 164 नगरसेवक आहेत. नव्याने जी 23 गावे समाविष्ट होत आहेत. त्यांची  २०११ च्या जनगननेनुसार लोकसंख्या १.९० लाख आहे. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत पुण्याच्या नगरसेवकांची संख्या फक्त दोनने वाढून 166 होणार आहे. या गावांच्या समावेशानंतर मोठ्या संख्येने नगरसेवकांची संख्या वाढून राष्ट्रवादीला सहज फायदा होण्याचे गणित या कमी वाढणाऱ्या नगरसेवकांनी बिघडवले आहे.

भाजपनेही या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार या गावांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे पक्षाचे आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादीला एकतर्फी वातावरण नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येते.       

प्रभाग रचनेबाबत सूचना नाही...

भाजपने २०१७ च्या निवडणुकीत ४ नगरसेवकांसाठी एक वॅार्ड तयार केला होता. त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे २०२२ च्या निवडणुकीत भाजपने तयार केलेली वॅार्ड रचना महाविकास आघाडी सरकार कडून बदलली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन वॅार्ड रचना करताना २३ गावांचा विचार केला जाणार आहे. वॅार्ड रचनेबाबत निवडणुक आयोगाकडून महापालिकेला कोणतीही सूचना मिळालेली नाही. तरीही भाजपची ताकद असलेल्या वाॅर्डांत समाविष्ट गावांचा भाग जोडून तेथे आपला उमेदवार निवडून आणण्याची खेळी राष्ट्रवादीला आता शक्य आहे. त्यामुळे पुण्याचे कारभारी कोण होणार, याचा फैसला 23 गावांतील समीकरणांवर अवलंबून राहू शकतो.  

महापालिकेत समाविष्ठ झालेल्या गावांची यादी

1)म्हाळुंगे 2)सूस 3)बावधन बू. 4)किरकिटवाडी 5)पिसोळी 6)कोंढवे-धावडे 7)कोपरे 8)नांदेड 9)खडकवासला 10)मांजरी बु. 11)नऱ्हे 12)होळकरवाडी 13)औताडे- हांडेवाडी 14)वडाची वाडी 15)शेवाळेवाडी 16)नांदोशी 17)सणसनगर 18)मांगडेवाडी 19)भिलारेवाडी 20)गुजर-निंबाळकरवाडी 21)जांभूळवाडी 22)कोळेवाडी 23)वाघोली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com