"पीआरसी'कडून अकोला जिल्ह्यातील पंचायत समित्यांची झाडाझडती  - PRC Akola tour | Politics Marathi News - Sarkarnama

"पीआरसी'कडून अकोला जिल्ह्यातील पंचायत समित्यांची झाडाझडती 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

पंचायत राज समितीने आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार (ता.दोन) जिल्ह्यातील पंचायत समित्यांची झाडाझडती घेतली. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरत समिती सदस्यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. 

अकोला : पंचायत राज समितीने आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार (ता.दोन) जिल्ह्यातील पंचायत समित्यांची झाडाझडती घेतली. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरत समिती सदस्यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. 

महाराष्ट्र विधान मंडळाच्या पंचायत राज समिती (पीआरसी) कडून गुरूवार (ता.एक) पासून जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. शुक्रवार (ता.दोन) पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रमेश बुंदेले, आमदार अमित झनक, आमदार राहुल मोटे, आमदार रुपनवर आदी लोकप्रतिनिधींसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पंचायत समित्यांना भेटी दिल्या. समिती सदस्यांनी बाळापूर पंचायत समितीला दिलेल्या भेटीत गटविकास अधिकारी हजर नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

समितीने गटविकास अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. कान्हेरी गवळी येथील ग्रामसेवक जि. के. धाडसे यांच्यावरही कठोर कारवाई केल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विविध विभागाकडून करण्यात आलेल्या खरेद्या, अनियमित बदल्या, प्रशासनातील भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे या दौऱ्यात प्रकर्षाने समोर येत असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या समितीचा दौरा धडकी भरविणाराच ठरला आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख