pravin darekar talks on k c padavi | Sarkarnama

जेव्हा प्रवीण दरेकर आदिवासी विकासमंत्र्यांना इशारा देतात!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

चार चार महिने वास्तु तयार असून देखील तिचा लोकार्पण होत नाही. पुढाऱ्यांना समाजासाठी चांगले करण्यासाठी वेळ मिळत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.   

सातारा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेची नवी इमारत उदघाटनाऐवजी पडून असल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 'त्या इमारतीचे टाळे फोडण्याचा' इशारा आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना दिला होता. त्यावर टाळे फोडण्यापेक्षा उद्धाटन तुम्हीच करा, असे पाडवींनी सांगितल्याचा किस्सा दरेकरांनी सातारकरांना ऐकवला.

सज्जनगड (ता. सातारा) नजीकच्या ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या 'ज्ञानोत्सव' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक अनिल देसाई, ज्ञानश्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर उर्फ भाई वांगडे, सचिव ज्ञानदेव रांजणे, कार्यकारी संचालक रोहित वांगडे, प्राचार्य अजय जाधव आदींची उपस्थिती

पालघर जिल्ह्यातील आठवण सांगताना दरेकर म्हणाले, विनवड या आदिवासी भागातील आश्रमशाळेला भेट देवून मुलींशी संवाद साधला. सर्व व्यवस्थित आहे असं मुली सांगत होत्या. पण त्यांच्या संवादात आत्मविश्‍वास नव्हता. मी मुलींना बोलते केले आणि ऐकतो तर काय छोट्याशा खोल्यांमध्ये 200 मुली राहत आहेत. त्या शाळेच्या अधिकाऱ्यांना विचारले तर नवीन इमारत दोन ते तीन महिन्यांपासून तयार आहे मात्र, उद्घाटनासाठी थांबलो आहोत असे सांगण्यात आले. मी तातडीने आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्याशी संपर्क साधला. आठवड्याच्या आत उद्घाटन करा अन्यथा मीच टाळे फोडीन असे सांगितले. त्यावर मंत्री पाडवी यांनी 'टाळे नको तुम्हीच उदघाटन करा' असे सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी मी मुलींसाठी वसतीगृह खूले केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख