प्रवीण दराडेंना शिवसेनेशी पंगा  भोवला ?

तत्कालीन महापौरांसाठी दराडे यांनी बंगला रिकामा करण्यास थेट नकार दिला होता. त्यामुळेच त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे. परंतु, आता दराडे यांची बदली झाल्याने बंगला रिकामा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
pravin-darade-ias
pravin-darade-ias

मुंबई  : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची पुणे येथील समाज कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली असून दराडे यांना महापालिकेचे "बंगला" प्रकरण भोवल्याचे बोलले जात आहे.


तत्कालीन महापौरांसाठी दराडे यांनी बंगला रिकामा करण्यास थेट नकार दिला होता. त्यामुळेच त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे. परंतु, आता दराडे यांची बदली झाल्याने बंगला रिकामा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


महाविकास आघाडीचे सरकार येताच बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांचाही समावेश आहे. 


मलबार हिल येथे महापालिकेचे दोन बंगले आहेत. त्यापैकी एका बंगल्यात तत्कालीन महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील सचिव प्रविण दराडे कुटुंब वास्तव्य करत होते. 


दरम्यान, दादर येथील शिवाजी पार्कवरील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापौरांना पर्यायी जागेसाठी मलबार हिल येथील पालिका जलविभागाचा बंगला उपलब्ध करुन द्यावा, अशी शिवसेनेची मागणी होती. 

पल्लवी दराडे यांची महापालिकेतून बदली झाल्यानंतर बंगला रिकामा करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या. यासाठी पत्रव्यवहार, नोटीस देखील बजावण्यात आल्या. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारसी शिवाय बंगला रिकाम करु नये, असे पत्र तत्कालीन महापालिका आयुक्तांनी जल अभियंता विभागाला ऑक्‍टोबर 2017 मध्ये पाठवले.


प्रवीण दराडे हे पालिकेच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांना हा बंगला दिला आहे. ते या सेवेत असे पर्यंत त्यांच्याकडून बंगला काढू नये, तसेच बंगल्याच्या भाडयासाठी दुप्पट रक्कम आकारू नये, असे निर्देश या पत्राद्वारे दिले होते. याबाबत 31 डिसेंबर 2014 मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी. 


तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय जल अभियंत्यांचा बंगला रिकामा करण्याबाबत नोटीस पाठवू नये, निर्देश पालिकेला दिले होते. 2014 मध्ये पाठवलेल्या पत्रावरुन महासभेत जोरदार पडसाद उमटले होते. मात्र, बंगला वाचविण्यासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी 2019 रोजी प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्ती पदी निवड केली. 


महापालिकेतील कोस्टल रोड, पाणी प्रकल्पासहीत महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी त्यांच्यावर होती. आता महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली केली जात आहे. 


 प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेतून पुणे येथील समाज कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदी गुरुवारी निवड केली. तर पल्लवी दराडे या अन्न व औषधे प्रशासनात नियुक्तीवर आहेत. त्यामुळे महापालिकेच्या जलविभागाचा बंगला रिकामा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेला एकेकाळी आव्हान दिलेल्या दराडे कुटुंबियांकडून बंगला रिकामा करण्यासाठीच अवघ्या वर्षभरातच बदली केल्याची कुजबुज पालिकेत सुरु आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com