PMO च्या पसंतीस उतरलेले श्रीकर परदेशी आता फडणवीस यांच्या दिमतीला

डॉ. श्रीकर परदेशी (Dr. Shrikar Pardeshi) यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सचिव म्हणून करण्यात आली.
Dr. Shrikar Pardeshi
Dr. Shrikar Pardeshisarkarnama

पिंपरी : अत्यंत प्रामाणिक आणि तेवढेच कार्यक्षम व कर्तबगार सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. श्रीकर परदेशी (Dr. Shrikar Pardeshi) यांची नियुक्ती नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सचिव म्हणून आज (ता.१२) करण्यात आली. परदेशातील एक वर्षाच्या प्रशिक्षणाहून परतताच त्यांची बदली थेट उपमुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आली. अनधिकृत बांधकामाचे कर्दनकाळ म्हणून त्यांची पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेचे आयुक्तपदाची कारकिर्द गाजलेली आहे. त्यांच्या येथील पावणे दोन वर्षाच्या कारकिर्दीत एका विटेचेही अनधिकृत बांधकाम शहरात झाले नव्हते, एवढा त्यांचा दरारा होता.

बुलडोझर मॅन तथा डिमॉलिशन मॅन म्हणून डॉ. परदेशी हे पिंपरी-चिंचवडपासून ओळखले जाऊ लागले. त्यांची ही सचोटी व कार्यक्षमता पाहूनच त्यांना २०१५ मध्ये पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) आपल्याकडे उपसचिव म्हणून प्रतिनियुक्तीवर घेतले. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवीत पदोन्नती घेतली. जून २०२१ ला ते पुन्हा महाराष्ट्रात परतले. त्यांची नियुक्ती `सिकॉम`चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली. तेथूनच ते वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी परदेशात गेले होते. तेथून परतताच त्यांची थेट उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून बदलीवर आज नियुक्ती झाली. त्याला त्यांनी स्वत: च 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. नव्या पदाचा कार्यभार कधी हाती घेणार असे विचारले असता ते अद्याप ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Dr. Shrikar Pardeshi
प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त अधिकाऱ्यांना परत बोलवा : महेश लांडगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

२३ मे २०१२ रोजी परदेशी यांची पिंपरींचे आयुक्त म्हणून बदली झाली तेव्हा शहरात अनधिकृत बांधकामाचा सुकाळ झाला होता. मात्र, अल्पावधीतच त्यांनी त्याविरुद्ध धडक कारवाई कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तसेच कुणाचाही दबाव येऊ न देता केली. त्यांचा हा धडाकाच त्यांच्या मुदतपूर्व बदलीला कारणीभूत ठरला. १० फेब्रुवारी २०१४ रोजी राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक म्हणून त्यांनी पुण्यात पावणेदोन वर्षातच मुदतपूर्व बदली करण्यात आली. ती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्याचा आरोप त्यावेळी झाला. त्यांची बदली रद्द होण्यासाठी पिंपरी-चिंचवडकर (Pimpri-Chinchwad) रस्त्यावर उतरले.

मात्र, अशा कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज राज्यात इतरत्रही आहे, असे कारण पवार यांनी त्यावेळी परदेशींच्या बदलीसंदर्भात दिले. नोंदणी महानिरीक्षक असतानाच पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे होता. प्रभारी पदभार असूनही त्यांनी डबघाईस असलेल्या बेशिस्त पीपएमपीएमएलला शिस्तही लावली होती. नोंदणी महानिरीक्षक असतानाच त्यांची बदली `पीएमओ`त झाली होती.

Dr. Shrikar Pardeshi
तुम्हाला देण्यासारखे माझ्याकडे काही नाही; पण मला तुमची ताकद हवीय !

खासगी कामासाठी ते सरकारी मोटारीचा कटाक्षाने वापर करणे टाळत होते. रजेवर असताना ते गावी आरामबसने जात असत. हेडमास्टर अशीच त्यांची प्रतिमा पालिकेत होती. गणवेष आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी तो सक्तीचा केला होता. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा दरारा होता. त्यांच्या कालावधीत पालिका कारभारच नाही, तर वाकड्यातील काही अधिकारी व कर्मचारी सुद्धा सुतासारखे सरळ झाले होते. पिंपरीतील महापालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालय हे चौथ्या मजल्यावर आहे. फिटेनेसविषयी खूप जागरूक असलेले डॉ. परदेशी हे कार्यालयात येताना वा जाताना कधीही लिफ्टचा वापर करीत नव्हते.

२००१ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या डॉ. परदेशींनी जेथे नियुक्ती होईल तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी कारकिर्द गाजली होती. यवतमाळ, कोल्हापूर, अकोला इथेही त्यांनी असेच काम केले. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. जलसंधारणावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com