अजितदादांनी सुनावल्यानंतर बारामतीच्या DySP नी जाहीर केला आपला मोबाईल क्रमांक!

बारामती तालुक्यात (Baramati) अवैध धंदे वाढल्याची तक्रार करण्यात आली होती.
अजितदादांनी सुनावल्यानंतर बारामतीच्या DySP नी जाहीर केला आपला मोबाईल क्रमांक!
Ajit Pawarsarkarnama

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नागरिकांचे निवेदन आले की ते त्यावर तातडीने कार्यवाही करतात. असाच अनुभव एका महिलेला आला आणि त्यानंतर आता चक्रे फिरू लागली आहेत. त्यामुळे तेथील उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) गणेश इंगळे यांनी आपला मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी जाहीर केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका कार्यक्रमात महिलेचे निवेदन मिळाले. त्यात अवैध दारूधंद्यामुळे संसाराचे कसे वाटोळे होत असल्याचे तिने कथन केले होते. हे निवेदन अजित पवार यांनी व्यासपीठावरच वाचून दाखवले. तसेच माईकवरूनच येथे कोणी पोलिस अधिकारी आहेत का, अशी विचारणा केली. त्या कार्यक्रमास गणेश इंगळे उपस्थित असल्याचे कळाल्यानंतर दादंनी माईकवरूनच त्यांना सूचना दिल्या. ``तुम्हाला कार्यक्षम अधिकारी म्हणून येथे आणले आहे. नागरिकांच्या अशा तक्रारींची दखल घ्या. संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर काय कडक कारवाई करायची ती करा. पण हे थांबवा, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आदेश दिला.

Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, सरकार नोटा छापायची मशिन नाही...

त्यानंतर पोलिस आता अँक्शन मोडमध्ये आले आहेत. स्वत: गणेश इंगळे यांनी आपल्या पथकाच्या मदतीने अवैध व्यावसायिकांचा शोध सुरु केला आहे. बारामती शहर परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी व त्याचे रसायन पोलिसांना मिळाले. यातील तिघांना अटक करण्यात आली असून दोघे जण पळून गेले. हनुमंत बबन लाड (वय 43, रा. बांदलवाडी ता.बारामती), मंगेश बबन लोंढे (रा.सुहासनगर आमराई ता.बारामती) या दोघांसह इतरही तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पुढील काळात अवैध गावठी हातभट्टी चालविणा-यांच्या घरातील कुटुंबियांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याची माहिती गणेश इंगळे यांनी दिली. बारामती व इंदापूर तालुक्यातील अवैध दारुव्यवसाय करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही सुरु झाली आहे. अशा वारंवार गुन्हे करणा-या व्यावसायिकांवर झोपडपट्टी दादा कायदाअंतर्गत कारवाई होणार आहे.

Ajit Pawar
बारामती पोलिसांचे ऑपरेशन माळेगाव : चार गुन्हेगारांना मोक्का 

उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोलिसांनी या कारवाईची व्याप्ती अधिक वाढवून अवैध दारु व्यावसायिकांना दारु पुरविणा-या वाईन शॉप व बार मालकांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

अवघ्या दोनच दिवसात पोलिसांनी तब्बल 21 गुन्हे दाखल केले असून 24 जणांवर कारवाई केली आहे. दुसरीकडे रोडसाईड रोमिओंवरही पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. दोन दिवसात तीस जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या पुढील काळात संध्याकाळच्या वेळेस पोलिस पथक शहरात फिरुन रोडसाईड रोमिओंवर कारवाई करणार आहे.

अवैध दारु, मटका, जुगार, अंमली पदार्थ यांविषयक तक्रार असल्यास माझ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांक 9011960200 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा असे आवाहन गणेश इंगळे यांनी केले आहे. .

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in